मुंबई : शासकीय गोदामापासून रेशन दुकानापर्यंत धान्य पोहोचवण्याचा वाहतूक खर्च वाढवून देण्याची मागणी करत रेशन दुकानदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाहतूक खर्च वाढवून दिला नाही, तर मुंबईसह राज्यातील रेशन दुकानदार फेब्रुवारीमध्ये वाटण्यात येणारे धान्य शासकीय गोदामामधून उचलणार नसल्याचे मुंबई रेशन दुकानदार संघटनेने सांगितले.संघटनेचे अध्यक्ष नवीन मारू यांनी सांगितले की, रेशनच्या धान्यासाठी लागणारी रक्कम दुकानदार आगाऊ स्वरूपात शासनाकडे भरणार आहेत. मात्र गोदामामधील धान्य उचलणार नाहीत. त्यामुळे रेशन कार्डधारकांचे हाल झाले, तर त्यास सर्वस्वी शासन जबाबदार असेल. राज्यातील काही जिल्ह्यांत ‘डोअर डिलीव्हरी’ पद्धतीनुसार शासकीय गोदामापासून रेशन दुकानापर्यंत धान्य पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. याउलट सर्वच ठिकाणी शासकीय गोदामापासून दुकानापर्यंत धान्य पोहोचवण्याचा वाहतूक खर्च दुकानदारांच्या माथी मारला जात आहे. त्यामुळे दुकानदार तोट्यात दुकाने चालवत आहेत.शासन दरबारी रेशन दुकानातून जेवणासाठी आवश्यक मसाले उपलब्ध करण्याची चर्चाही सुरू असल्याचे मारू यांनी सांगितले. या योजनेला विरोध नसला, तरी दुकानदारांना पुरेसा रॉकेलपुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कारण रॉकेलच्या कोट्यात कपात केल्याने परिस्थितीने गरीब असलेल्या कार्डधारकांना जेवण तयार करणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे शासनाने मसाल्यांवर पैसा खर्च करण्याऐवजी दुकानांमार्फत पुरवण्यात येणारे धान्य शिजवण्यासाठी आवश्यक रॉकेलपुरवठा करण्याची मागणी मारू यांनी केली आहे.
वाहतूक खर्चासाठी रेशन दुकानदार आक्रमक
By admin | Published: December 29, 2015 2:03 AM