सोलापूर : रास्तभाव दुकानात अर्थात रेशन दुकानांमध्ये आता विविध जीवनावश्यक वस्तू विकण्याची मुभा शासनाने दिली आहे. शासनाच्या निर्णयाचे काही दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले तर काहींनी यावर चिंता व्यक्त केली, मात्र रेशनदुकानात आता टूथपेस्ट, रवा, मैदा, बेसन, गूळ, शेंगा तेल, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, वॉशिंग पावडर, चहा पावडर आदी दैनंदिन गरजेच्या किराणा वस्तूंची विक्री होत आहे. रेशन दुकानदारांनीही स्पर्धा करण्यासाठी उधारीचा पर्याय निवडला आहे, यास ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दुकानदारही समाधानी आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एकूण १८५४ रेशन दुकाने आहेत़ यावर दहा लाख ग्राहक अवलंबून आहेत. राज्य शासनाने नुकताच एक आदेश (जीआर) जारी केला. यानुसार यापुढे रेशनदुकानात शालेय स्टेशनरी साहित्य विकण्याची मुभा रेशन दुकानदारांना देण्यात आली आहे़ या जीआरचे स्वागत झाले.
सोलापूर शहर व जिल्हा सरकार मान्य रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील पेन्टर यांनी सांगितले. शासनाच्या निर्णयाचे स्वागत झाले, पण या निर्णयाची अंमलबजावणी खुद्द शासन करणे गरजेचे आहे़ ही उत्पादने शासनाकडून मिळाल्यास दुकानदारांना योग्य कमिशन मिळेल, अशी अपेक्षा दुकानदारांना आहे. बाहेर मार्केटमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून दुकानात विकल्यास रेशन दुकानदारांना फारसा फायदा होणार नाही़ त्यामुळे शासनाकडून वस्तू मिळाव्यात़ शासनाचे प्रयत्न चांगले आहेत़ या प्रयत्नासोबत शासनाने दुकानदारांना कमिशन वाढवून दिल्यास दुकानदारांचा व्यवसाय जिवंत राहील़ गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही वाढीव कमिशनची मागणी करतोय, याकडे शासन लक्ष देईना.
रेशन दुकानात येणाºया ग्राहकांची संख्या कमी झाली होती. ठराविक लोकच धान्य आणि साखर घेण्यासाठी येत असत; पण आता सर्व स्तरातील ग्राहक आमच्या दुकानात येऊन खरेदी करीत आहेत. गल्ल्यांमध्ये असलेल्या या दुकानांमध्ये उधारीने वस्तू मिळत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक अगदी महिन्याचा मालही आता घेऊन जात आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे आमच्या व्यवसायाची व्याप्ती वाढली. शिवाय व्यवसायवृध्दीही होत आहे.- नितीन पेन्टरजिल्हा संपर्क प्रमुख : सोलापूर शहर व जिल्हा रेशन दुकानदार संघटना