ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - राज्यातील रेशन दुकानदारांनी सरकारविरोधात १ आॅगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी सायंकाळी पाच वाजता माटुंगा मध्ये रेल्वे स्थानकाजवळील लक्ष्मी नारायणलेनमधील श्री कच्छी लोहार वाडी येथे पार पडणार आहे. या बैठकीत रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हानिहाय प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबई रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारू यांनी दिली.मारू यांनी सांगितले की, रेशन दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेने याआधीच १ आॅगस्टपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. मात्र दुकानदारांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर दिसत नाही. त्यामुळे रेशन दुकानांचे परवाने परत करण्याचा विचार दुकानदार करत आहे. शनिवारी पार पडणाऱ्या मेळाव्यात यासंदर्भात ठोस घोषणा करण्यात येईल, असेही मारू यांनीसांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला पायउतार करून भाजपला सत्तेत आणण्यात रेशन दुकानदारांचा मोठा वाटा असल्याचा दावा संघटनेने केला आहे. दोन वर्षांनंतरही दुकानदारांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबाबत सरकार दरबारी चालढकल सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अखेर सुमारे १० वर्षांनंतर मुंबईत रेशन दुकानदारांना राज्यव्यापी बैठक घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तोडगा काढला नाही, तर त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडू, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
रेशन दुकानदारांची उद्या राज्यव्यापी बैठक
By admin | Published: July 22, 2016 8:33 PM