- सरकारविरोधात अनोखे आंदोलन
मुंबई, दि.20 - राज्यातील रेशन दुकानदारांनी सरकारविरोधात १ आॅगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. मात्र सरकारचा निषेध व्यक्त करताना जनसामान्यांना त्रास होऊ नये, म्हणून स्वस्तात तूरडाळ, पामतेल आणि भाजीपाला विकण्याचा विचार रेशन दुकानदार संघटना करत आहे.मुंबई रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नविन मारू यांनी लोकमतला सांगितले की, सरकारने रेशन दुकानांतून तूरडाळ विक्रीचा परस्पर निर्णय घेतला. याबाबत संघटनेसोबत कोणतीही चर्चा केली नाही. याआधी गेल्या दोन वर्षांपासून संघटना कमिशनसारख्या महत्त्वाच्या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे. डोअर डिलीव्हरी यंत्रणा सुरू करण्यात अद्याप सरकारला यश आलेले नाही. याशिवा इतर मागण्यांकडेही सरकार साफ दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला आहे. सरकारविरोधातील आंदोलनाचा त्रास सामान्यांना होऊ नये, म्हणून दुकानदारांची पुढील आठवड्यात बैठक आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, या बैठकीमध्ये रेशन दुकानदारांच्या माध्यमातून महाग झालेली तूरडाळ, पामतेल आणि भाजीपाला विक्रीचा निर्णय घेण्याचा विचार आहे.त्यासाठी ६६ रुपये प्रति किलोग्रॅम दराने अख्खा तूर विकत घेऊन त्याची डाळ तयार केली जाईल. डाळ करण्याचा खर्च आणि वाहतूक खर्च मिळून सुमारे ७५ रुपये किलो दराने तूरडाळ विकण्याचा विचार आहे. याशिवाय अनुदानाशिवाय ५५रुपये प्रति लीटर दराने पामतेलही रेशन दुकानदार खुल्या बाजारात विक्री करतील. याशिवाय महाग झालेला भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून उचलून थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचेही विचाराधीन आहे. या सर्व जीवनावश्यक गोष्टी ग्राहकांपर्यंत कशाप्रकारे पोहचवता येतील, याची चर्चा करून ठोस निर्णय बैठकीत घेतला जाईल.१ आॅगस्टपासून काय मिळणार?१ आॅगस्टपासून रेशन दुकानदारांनी राज्यव्यापी बेमुदत बंदची हाक दिली आहे. रेशन दुकानदार आॅगस्टमध्ये उचलण्यात येणाऱ्या रेशन धान्याचे पैसे सरकारला जमा करतील. मात्र गोदामातील माल उचलणार नाही. त्यामुळे रेशनकार्डधारकांना रेशनवरील धान्य मिळणार नाही. याउलट रेशन दुकानातून खुल्या बाजारातील सफेद केरोसीन, पामतेल, तूरडाळ आणि भाजीपाला विकण्याचे विचाराधीन आहे.
...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा! कमॉडिटी मार्केटमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा जुगाराचा बाजार बंद केल्यास जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्यात येतील, असा दावा मारू यांनी केला आहे. तसे नाही झाले, तर पदाचा राजीनामा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. मात्र दर कोसळले, तर मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हानही मारू यांनी दिले आहे.