मुंबई : ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्येप्रकरणी छोटा राजनवर आरोप निश्चित करण्याबाबत सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपला असून, ३१ आॅगस्टला बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होईल.जे. डे यांची हत्या छोटा राजनच्या सांगण्यावरूनच करण्यात आली. त्यानेच हत्येचा कट रचला, हे सिद्ध करण्यासाठी तपास यंत्रणेकडे पुरेसे पुरावे आहेत, असे सीबीआयचे वकील भरत बदानी यांनी विशेष सीबीआय न्यायालयाला सांगितले. आरोप निश्चितीबाबत सीबीआयच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्या. समीर आडकर यांनी ३१ आॅगस्टपर्यंत पुढील सुनावणी तहकूब केली. राजनने त्याच्या अन्य सहकाऱ्यांमध्ये झालेल्या संभाषणाची सीडी देण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. या सीडीवर अवलंबून आहोत, असे जेव्हा सरकारी वकील खटल्यादरम्यान सांगतील; त्या वेळी ही सीडी देण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. डे यांनी राजनविरुद्ध काही लेख लिहिल्याने तसेच डे यांचे प्रकाशनाच्या मार्गावर असलेल्या पुस्तकात राजनकरिता ‘चिंधी’ हा शब्द वापरल्याने संतापलेल्या राजन याने डे यांची हत्या करण्याची सुपारी त्याच्या गुंडांना दिली. जे. डे आपली सर्व माहिती दाऊदला पुरवत असल्याचा संशय छोटा राजनला होता. मात्र डे यांची हत्या केल्यानंतर छोटा राजनला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. त्याने तसे काही पत्रकारांना सांगितल्याचे सीबीआयने दोषारोपपत्रात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
छोटा राजनवरील आरोप निश्चितीचा युक्तिवाद संपला
By admin | Published: August 28, 2016 3:23 AM