लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दुसऱ्या कथित पत्नीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून ठाण्यातील शिधावाटप विभागाचे सहायक नियंत्रक प्रकाश परदेशी (५६, रा. कांदिवली) यांनी आपल्याच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यांच्याकडे मिळालेल्या तीन चिठ्ठ्यांमधील आरोपावरून पोलिसांनी या पत्नीलाही ताब्यात घेतले आहे. पत्नीकडून वारंवार होणाऱ्या अवास्तव मागण्या तसेच पोलीस ठाण्यात तक्रार करण्याच्या धमकीला कंटाळून परदेशी यांनी हे पाऊल उचलले. बुधवारी वीर सावरकर मार्गावरील आरामबाग इस्टेट येथील शिधावाटप उपनियंत्रक कार्यालयात सर्व कर्मचारी सकाळी कार्यालयात आले. ११ च्या सुमारास सहायक शिधावाटप अधिकारी शशिकांत भोईर परदेशी यांच्या केबिनमध्ये गेले. त्या वेळी त्यांना ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी नौपाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. त्याच वेळी त्यांच्या केबिनमध्ये एक मराठीत, दुसरी इंग्रजी हस्ताक्षरात तर संगणकावर टाइप केलेली तिसरी अशा तीन चिठ्ठ्या पोलिसांना मिळाल्या. शिधावाटप कार्यालयाच्या चर्चगेट येथील मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ लिपिक महिलेबरोबर आपले १९९३ पासून प्रेमसंबंध आहेत. तिचाही घटस्फोट झाल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. परदेशींची पत्नीही त्यांना सोडून अन्यत्र वास्तव्य करीत होती. त्यांचा मुलगा एअर इंडियात वैमानिक आहे. या लिपिक महिलेशी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा चार वेळा विवाह झाल्याचा दावा त्यांनी आपल्या चिठ्ठीत केला आहे.आमची कोणाविरुद्ध तक्रार नाही - परदेशीप्रकाश परदेशी यांच्या चिठ्ठीनुसार १९९३ पासून त्यांचे त्यांच्या सहकारी महिलेशी संबंध असले, तरी तिने मात्र २०१० पासून आजपर्यंत त्यांच्याशी संबंध तोडले होते. एकीकडे पत्नी निघून गेली, दुसरीकडे या सहकारी महिलेनेही त्यांच्याशी संबंध तोडल्याने ते प्रचंड वैफल्यग्रस्त होते. तरीही, ते तिला वारंवार फोन करून परत येण्याबाबत विचारणा करत होते. तिने मात्र ठाम इन्कार करत त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. दरम्यान, आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे परदेशी यांच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.मंगळवारी या महिलेने परदेशी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यात ते फोनवरून धमकी देतात, लग्नासाठी विचारणा करतात. मी त्यासाठी होकार न दिल्याने ते वारंवार धमकी देत असल्याचे पोलीस ठाण्यातील तक्रारीत तिने म्हटले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ पाटील यांनी सांगितले.
शिधावाटप अधिकाऱ्याची आत्महत्या
By admin | Published: June 29, 2017 1:51 AM