राजाराम कांबळे -- मलकापूरपैसा देणारे पीक म्हणून रताळी पीक घेण्याचा कल शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील वीस ते चाळीस गावांत वाढत आहे. रताळी काढणी गतिमान झाली आहे. चालू वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. शाहूवाडीतील रताळी नवी मुंबई, गुजरात, पुणे, कऱ्हाड, आदी बाजारांत दाखल झाली आहेत. घाऊक बाजारात ३५ ते ४० रुपये किलोला दर मिळाला होता. दर समाधानकारक असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे रताळी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची दीपावली चांगली होणार आहे. चालूवर्षी तालुक्यातून दहा हजार टन रताळी निर्यात झाली आहेत.शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण भागातील पेरीड, निळे, कडवे, भोसलेवाडी, अमेणी, तुरकवाडी, कोतोली, कांडवण, पणुंद्रे, शिंदेवाडी, माण, परळे, उचत, आंबार्डे, शिराळे, ओकोली, गोगवे, भैरेवाडी, सुपात्रे, सावे, कोपार्डे, शित्तूर, मलकापूर या परिसरातील शेतकरी हे रताळी व्यावसायिक पीक घेताना दिसतात. नवरात्रौत्सवात व ईदला रताळ्याला मोठी मागणी असते. कोकणातील रत्नागिरी, खेड, चिपळूण, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, नगर, नाशिक, पुणे, वाशी, मुंबई, सुरत, बडोदा, गुजरात, आदी बाजारपेठेत येथील लाल रंगाची गोड रताळी निर्यात होत असल्याचे सुशांत तांदळे, सुभाष कोळेकर यांनी सांगितले.खरीप हंगामातील भाताबरोबर रताळी वेलाची लागवड मृग नक्षत्रात केली जाते. रेती मिश्रित मातीत हे पीक चांगले येते. चालूवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने उत्पादनात वाढ झाली. मात्र, रताळी मोठी न होता मध्यम स्वरूपाची मिळाली. तीन महिन्यांचे नगदी पीक नवरात्रौत्सव, ईद व दीपावली सणात काढण्यात येते. ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हाती ताजा पैसा येतो. कमी खर्चात जादा उत्पादन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा हे पीक घेण्याकडे कल वाढत आहे. उसाला टनाला दोन ते अडीच हजार रुपये दर मिळतो. मात्र, तीन महिन्यांत टनाला १५ ते २0 हजार रुपये दर मिळतो.पाच ते सहा वर्षांपूर्वी दलाल अगर पेढ्यांमार्फत रताळी स्थानिक बाजारपेठेत पाठविली जात होती. आता शेतकरी स्वत: वाहनातून वाशी, मुंबई, पुणे, कऱ्हाड, कोकणच्या बाजारात रताळी विक्रीस नेण्याचे धाडस करीत असल्यामुळे त्याला जादा पैसे मिळत आहेत. उसापेक्षा रताळीला जादा दर मिळत असल्यामुळे रताळी हा प्रमुख व्यवसाय होण्याची शक्यता आहे. पेरीड गाव अग्रेसर मलकापूर बाजारपेठेजवळ असणाऱ्या पेरीड गावातील शेतकरी दरवर्षी रताळीचे मोठे पीक घेताना दिसतात. दरवर्षी दोन हजार टन रताळी उत्पादन घेतले जाते.शाहूवाडी तालुक्यात रताळी पिकावर प्रक्रिया होणारा कारखाना शासनाने काढल्यास रताळी पिकाला चांगला दर मिळून तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. - मारुती जाधव, शेतकरी १००० हेक्टरवर रताळीचे उत्पादन१० हजार --टन तालुक्यातून रताळी निर्यात१ टन -१० ते २० हजार रुपयांचा दर
शाहूवाडीतील रताळी गुजरातच्या बाजारात
By admin | Published: October 26, 2016 9:09 PM