मुंबई - रत्नागिरीतील बारसू रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक भूमिपूत्रांची, आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरु आहे. आंदोलकांना अटक करण्यात येत आहे. पत्रकारांना धमकावण्यात येत आहे. या मुस्कटदाबी, धमकीसत्राचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
अजित पवार म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत शांततामय मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असून राज्य सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करावा. पोलिसांची दडपशाही थांबवावी, हे आंदोलन मानवी दृष्टीकोनातून संवेदशीलपणे हाताळावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच विकासाची भूमिका घेतली आहे, परंतु विकास सर्वांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. स्थानिक भूमिपूत्रांच्या हितांचं, हक्कांचं रक्षण झालं पाहिजे. स्थानिक भूमिपुत्रांच्या मनातल्या शंका-कुशंका दूर करुन त्यांना विश्वासात घ्यावं. स्थानिक ग्रामस्थ, तरुण, महिलावर्गावर पोलिसांकडून दडपशाही करण्यापेक्षा समन्वय, संवादातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.
संजय राऊतांचा हल्लाबोलमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन दिवस रजेवर गेले आहेत आणि इकडे कोकणातील बारसु येथे रिफायनरी विरोधात आंदोलन पेटले आहे. पोलीस दडशाहीच्या मार्गाने आंदोलन चिरड्यासाठी घुसले आहेत. महाराष्ट्रात मोगलाई सुरु असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेपत्ता. हा काय प्रकार आहे? असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?रत्नागिरीच्या बारसू परिसरात सकाळपासूनच ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली. मातीचे सर्वेक्षण करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचा कंटेनर सर्वेक्षणस्थळी दाखल झाला आहे. कामात कोणतीही अडचण येऊ नये, ग्रामस्थांनी काम अडवू नये, यासाठी तेथे प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र मंगळवारी सकाळी नियोजित सर्वेक्षणस्थळाकडे जाणाऱ्या पोलिसांच्या अनेक गाड्या ग्रामस्थांनी वाटेतच अडवल्या. त्यात अनेक महिला ग्रामस्थ रस्त्यावर झोपल्या होत्या या सर्व महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले.