रत्नागिरी: येथील आरे-वारे खाडीत पोहायला गेलेले पुण्यातील पाच तरुण बुडाल्याची घटना रविवारी (ता. 1) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यातील चार जणांना वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले असून बुडालेला एकजण अद्यापही बेपत्ता आहे. काळोख झाल्यामुळे त्या तरुणांचा शोध घेण्यात अडथळा निर्माण झाला आहे.
आज सायंकाळी पुण्यातील पाच तरुण फिरण्यासाठी येथे दाखल झाले. त्यात अनंत गुडी, पंकज सिंग, विकास पटेल, अनुज सिंग परिहार आणि एक जण यांचा समावेश होता. किनार्यावर फिरुन झाल्यानंतर ते पोहण्यासाठी खाडीत उतरले. सायंकाळी भरतीची वेळ असल्याने पाणी हळूहळू वाढू लागले. समुद्र आणि खाडीचे मुख असल्याने तेथे भोवरा तयार होतो. तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने ते तरुण बुडू लागले. पाण्यात गटांगळ्या खाणार्या तरुणांना पाहिल्यावर किनार्यावरील लोकांची गडबड सुरु झाली. त्यांना वाचविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यातील तिघांना वाचवण्यात यश आले. अनंत आणि अनुजसिंग हे दोघे खोल पाण्यात वाहून जात होते. त्यातील अनंतला बाहेर काढण्यात यश आले. पोटात पाणी गेल्यामुळे तो गंभीर अवस्थेत होता. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; मात्र अनुजसिंग या तरुणांचा अजूनही शोध लागलेला नाही. ही घटना समजल्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. काळोखामुळे बेपत्ता तरुणाचा शोध घेताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.