रत्नागिरी: भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यातील राजकारण तापले आहे. यासंदर्भात राणे यांना अटकही झाली आणि जामीनही मिळाला. मात्र, यानंतर आता राणे अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. त्यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निशाण्यावर घेत टोलेबाजी केली. (Ratnagiri Jan ashirwad yatra BJP Leader Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray)
नारायण राणे यांनी आपल्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान आज रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राणे म्हणाले, "जगाच्या पाठीवर, घरात राहून, पिंजऱ्यात राहून कुणी सत्ता चालवली, असे एकही उदाहरण नाही. मंत्रालयात जायचे नाही, कॅबिनेटला हजर राहायचे नाही. फक्त वर्षावर गप्पा मारायला जायचे, असे म्हणत, केस केल्यामुळे राणे घाबरून जाईल असे यांना वाटत असेल, मात्र, मी घाबरणारा नाही. ते रक्तातच नाही," असेही राणे यावेळी म्हणाले.
सुशांतसिंह राजपूत अद्याप संपलेलं नाही -याच वेळी राणे यांनी काही जुन्या प्रकरणांनाही हात घातला. सुशांतसिंह राजपूत हत्या आणि दिशा सालियान प्रकरण अद्याप संपलेले नाही. त्याचे आरोपी अजून मिळालेले नाहीत. नारायण राणेच्या पाठी लागू नका, नाही तर मी आता थोडच बोलतोय, मग सर्वच बोलाव लागेल. ते परवडणार नाही. असेही राणे यावेळी म्हटले. एवढेच नाही, तर आम्ही कायम विरोधी पक्षात राहणार नाही. आम्हीही सत्तेत येऊ. त्यामुळे अधिकारी आणि पोलिसांनी कायद्यात राहून काम करावे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.
दोन वर्षांत कोकणाला काय दिलं ? -महाविकास आघाडी सरकार येऊन जवळपास 2 वर्षे झाली आहेत. या 2 वर्षांत कोकणाला काय दिले? असा सवालही राणेंनी केला. दादागिरी करू नका, माझ्या वाट्याला जाऊ नका, असा इरा देत, आम्ही घरात बसून राहत नाही. लोकांमध्ये मिसळून, त्यांच्याशी संवाद साधून कामे करतो, अशा शब्दांत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.