नारायण राणेंना उमेदवारी मिळाल्यावनंतर रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये राजकीय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. राणे गावागावात जाऊन तेथील प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घेत आहेत. विविध राजकीय जबाबदाऱ्यांमुळे याकडे गेली काही वर्षे त्यांचे दुर्लक्ष झाले होते. आता या भेटींचा फायदा राणेंना होण्याची शक्यता आहे. परंतु दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रशासनाने या ना त्या कारणाने त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
उद्धव ठाकरेशिवसेना गटाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. आमदार राजन साळवी यांच्यावरील एसीबीच्या कारवाईवरून मोरे यांनी बाळासाहेब असते तर एसीबीच्या अधिकाऱ्यांचे काय केले असते, असे वक्तव्य केले होते. यावरून त्यांच्यावर विविध कलमांखाली खेड पोलीस ठाण्यास सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या नोटीसवर खेड प्रांताधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार असून मोरे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी मुदतही देण्यात आली आहे. यावरून ठाकरे गट टीका करत आहे. तडीपारीमुळे मोरे रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाचा प्रचार करू शकणार नाहीत. याचा फटका उमेदवार विनायक राऊत यांना बसण्याची शक्यता आहे. प्रचार ऐन रंगात आल्याने व ही कारवाई झाल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.