रत्नागिरी: नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. साळवी यांचा विजय नक्की आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने रत्नागिरीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पाठिंबा द्यावा, यासाठी आपण दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पाठिंब्यासाठी विनंती करणार आहे, अशी माहिती शिवसेना आमदार उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
साळवी यांचा अर्ज भरताना नगरपरिषद जवळ मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे विजय हा शिवसेनेचाच होणार याबाबत आम्हाला खात्री आहे. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करताना बंड्या साळवी यांनी शहरात अनेक उपक्रम राबविले. ६३ कोटींच्या नळपाणी योजनेचे काम ही युद्धपातळीवर सुरु आहे. पावसामुळे रत्नागिरी शहरात जे रस्त्यांवर खड्डे पडले होते, त्याचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. जिल्हा नगरोत्थानमधून जो निधी मिळाला आहे, त्यातील कामेही सुरु झाली असल्याचे सामंत म्हणाले.
या पार्श्वभूमीवर २९ डिसेंबरला जे काही मतदान रत्नागिरीत होईल, त्यापैकी ७० टक्के मते ही शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळयी यांना मिळतील. रत्नागिरी महाराष्ट्र विकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पाठिंबा दिल्यास त्याबाबत उमेदवार माघार घेईपर्यंत निर्णय होऊ शकेल. तसेच शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठींबा मिळावा म्हणून शरद पवारांची भेट घेणार असल्याचे सुद्धा आमदार सामंत म्हणाले. परंतु निर्णय झाला नाही तरीही शिवसेना स्वबळावर ही निवडणूक जिंकेल, असेही आमदार सामंत म्हणाले.
दोन दिवसांपूर्वीच भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झाला आहे. त्यांचा आरोप आहे की, रत्नागिरी शहरातील रस्त्यांचा, विकासाचा शिवसेनेने बट्ट्याबोळ करून टाकला आहे, याबाबत आपले काय मत आहे, असे विचारता सामंत म्हणाले, त्यांनी काय म्हटले, यापेक्षा मतदारांवर आमचा विश्वास आहे. राहुल पंडित यांनी व्यक्तीगत कारणाने त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे ही निवडणूक लादल्याचा विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचे सुद्धा सामंत म्हणाले.