निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणाला समृद्ध असा इतिहासही लाभला आहे. अनेक ऐतिहासिक गड,कोट, किल्ले कोकणात इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. दरम्यान, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि खेड तालुक्याच्या सीमेवर एक किल्ला असल्याचे समोर आले आहे. या किल्ल्याचं नाव रामगड असून, दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि डॉक्टर सचिन जोशी यांनी या किल्ल्याचा ठावठिकाणा शोधून काढला आहे. हा किल्ला पालगडच्या पूर्वेस समुद्र सपाटीपासून सुमारे ३९० मीटर उंचीवर स्थित आहे. जवळच असलेल्या पालगडचा हा जोड किल्ला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या किल्ल्याचे सॅटेलाइट फोटो काढण्यात आले असून, त्यामधून तिथे काही बांधकामाचे अवशेष दिसून आले आहेत. आता किल्ल्याबाबत काय नवी ऐतिहासिक माहिती समोर येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कालौघात या किल्ल्यावरील बांधकामांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. किल्ल्यावर काही थडगी आणि काही भांड्यांचे अवशेष सापडले आहेत.
नव्याने प्रकाशात आलेला रामगड हा किल्ला पालगडचा जोडकिल्ला आहे. मात्र तो जोडकिल्ला असल्याने त्याची स्थाननिश्चिती झाली नव्हती. सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये रामगड नावाचे दोन किल्ले आहेत. त्यातील एक किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तर दुसरा किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यात सापडला आहे. मात्र नव्याने आढळून आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रामगड या किल्ल्याचं बांधकाम कधी झालं. कुणी केलं, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या किल्ल्याचा इतिहास शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.