रत्नागिरी - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा कट रचला होता, तेव्हाच्या पोलीस अधीक्षकांनी गुप्त माहितीचा हवाला देत राज ठाकरेंना कोकणात न थांबण्याचा सल्ला दिला होता असा मोठा दावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. रत्नागिरी येथील नारायण राणेंच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी संदीप देशपांडे म्हणाले की, नारायण राणेंनी शिवसेनेत बंड केले, तेव्हा इथं निवडणूक लागली. तेव्हा आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेत काम करत होतो. राज ठाकरेंच्या नेतृ्त्वात आम्ही इथं प्रचाराला आलो होतो. सगळीकडे प्रचार सुरू होता. मुंबईतले अनेक शिवसैनिक इथे येत होते. त्यावेळी इथले पोलीस अधीक्षक होते, के प्रसन्न, ते राज ठाकरेंना भेटले. तुम्ही कोकणात थांबू नका, कोकणात प्रचार करू नका असं त्यांनी सांगितले. तेव्हा असं काय घडलंय हा प्रश्न राज ठाकरेंनी पोलीस अधीक्षकांना विचारला, तेव्हा या निवडणुकीच्या माध्यमातून एक फार मोठं षडयंत्र रचलं जात आहे. तुमच्यावर एक प्राणघातक योजना आखल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली आहे. आणि हा हल्ला तुमच्याच लोकांकडून होणार असून त्यात नारायण राणेंचं नाव घातलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी राज ठाकरेंना दिली. आता हे करणार माणूस कोण हे नाव सांगायची गरज नाही. ते जनतेला आपोआप कळेल असं त्यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे तुम्हाला सहानुभूती का दाखवायची?
मोर्चा काढायचा, सेटलमेंट करायची, खोके घ्यायचे आणि दुसऱ्यांना प्रश्न विचारायचे हे यांचे आतापर्यंतचे उद्धव ठाकरेंचं राजकारण, आता या सर्व गोष्टी निघायला लागल्या तर काही समाजवादी पत्रकार बसलेत, ज्यांना चॅनेलमध्ये कुणी विचारत नाही म्हणून ते युट्यूबवर आलेत. मग उद्धव ठाकरेंना खूप सहानुभूती आहे. कशाबद्दल सहानुभूती आहे? महाराष्ट्रातील मराठी जनतेने तुम्हाला सहानुभूती कशाला द्यायची, कोरोना काळात जनतेचे हाल केले म्हणून सहानुभूती द्यायची, वाधवान नावाच्या श्रीमंत व्यक्तीला महाबळेश्वर जायला परवानगी द्यायची म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची, अंबानींच्या घराखाली स्फोटकं ठेवणाऱ्या वाझेला तुम्ही संरक्षण दिले म्हणून सहानुभूती द्यायची? तुमच्या अडीच वर्षाच्या काळात विकासाची कामे थांबवली म्हणून सहानुभूती द्यायची? कोकणातील जनतेला पूरात आश्वासने देऊन कुठलीही आर्थिक मदत केली नाही म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही
अडीच वर्षात मंत्रालयात २ वेळाच गेले, वर्षा बंगल्यावरही मुख्यमंत्री भेटत नव्हते, तेव्हा महाराष्ट्रातील जनता त्यांच्या समस्या घेऊन कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटायला यायचे. महाराष्ट्रात जोपर्यंत मनसे आणि राज ठाकरे आहेत तोपर्यंत कुणाच्या बापात मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची हिंमत नाही. मराठी कार्ड वापरून मराठी माणूस धोक्यात आहे असं सांगून मते मागायची. पण उद्धव ठाकरे तुम्ही म्हणजे मराठी नाही. तुम्ही आणि संजय राऊत हे महाराष्ट्र नाही. तुम्ही धनुष्यबाणही नाही, तुम्ही शिवसेनाही नाही. हे सत्य आणि वास्तव आहे. आज महायुतीसोबत मनसे खंबीरपणे उभी आहे. हिंदुत्वासाठी, महाराष्ट्रासाठी, युवकांसाठी बिनशर्त पाठिंबा द्यायचं काम राज ठाकरेंनी केले आहे असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.