मविआत ज्या प्रमाणे जागांसाठी खेचाखेची सुरु आहे तशीच रस्सीखेच महायुतीमध्ये देखील सुरु झालेली आहे. शिंदे गटाचा उमेदवार नको म्हणून नाशिक भागातील शेकडो कार्यकर्ते अजित पवारांच्या देवगिरीवर दाखल झालेले आहेत. असे असताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात सर्व्हे आल्याचा दावा भाजपच्या नेत्याने केल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे.
रत्नागिरीकरांना बदल हवा आहे, विद्यमान आमदार नको आहे, हे सर्व्हेतून पुढे आले आहे, असे भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी म्हटले आहे. गेली अनेक वर्षे भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे. उद्यापासून 23 नोव्हेंबरपर्यंत खऱ्या अर्थाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संग्राम सुरु झाला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात जनतेला बदल हवाय अशी कुणकुण माझ्या कानावर आली आहे, असे माने म्हणाले.
या निवडणुकीत बाळ माने यांनी काय भूमिका घ्यावी, यासाठी मतदारांना मी साद घालत आहे. बदल पाहिजे मग सक्षम समर्थ पर्याय म्हणून कोण हवा आहे? मतदारांच्या काय अपेक्षा आहेत? काय मते आहेत हे जर मला सांगितले तर समर्थ पर्याय म्हणून भूमिका घेणे मला सोपे होईल, असेही बाळ माने म्हणाले आहेत.
अजून कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही, त्यामुळे जे घडेल ते बघू, असे म्हणत माने यांनी बंडाचे निशान फडकविण्याचे संकेत दिले आहेत.
रत्नागिरीत परिस्थिती काय?
पितृपक्षात बाळ माने यांनी मातोश्रीवर भेट दिली असल्याची जोरदार चर्चा हाती. माने यांनी या वृत्ताचे खंडनही केले नाही आणि स्वीकारही केला नाही. रत्नागिरीची जागा भाजपला मिळावी, अशी मागणी त्यांनी सातत्याने केली होती. मात्र ही जागा शिंदेसेनेलाच मिळणार असल्याचे स्पष्ट होत असल्याने माने यांनी गुरुवारी उद्धवसेनेतील इच्छुक उमेदवार राजेंद्र महाडिक आणि उदय बने यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली.
रत्नागिरीचे आमदार हे उदय सामंत आहेत. त्यांच्याविरोधात लोकसभेला त्यांच्याच सख्ख्या भावाने भूमिका घेतली होती. उदय सामंत हे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. यामुळे रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेची उमेदवारी आपल्याला मिळेल या आशेने किरण सामंत यांनी तयारी केली होती. गेली पाच वर्षे अगदी मूळ गाव वेंगुर्ल्यापर्यंत किरण सामंत यांचे बॅनर जागोजागी झळकत होते. परंतू, भाजपाने शिंदेंकडून ती जागा काढून घेत नारायण राणेंना दिल्याने ते नाराज झाले होते. राणेंच्या उमेदवारी अर्जावेळी हजर असणारे किरण सामंत अचानक गायब झाले होते. किरण सामंत यांनी आपल्या कार्यालयांवरून उदय सामंत यांचे फोटो, बॅनरही काढून टाकले होते. किरण सामंतांमुळे राणे समर्थकही नाराज झालेले आहेत. निलेश राणे यांनी याचा बदला घेण्याचा इशाराही दिलेला आहे. अशातच उदय सामंत यांना ठाकरे सेनेच्या उमेदवारासोबत दोन हात करायचे आहेत.