काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची तुलना सापाशी केल्यानंतर, भाजप आक्रमक झाला आहे. भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसला जबरदस्त घेरले आहे. (Mallikarjun Kharge snake controversy) यानंतर आता शिवसेनेनेही (ठाकरे गट) या वादात उडी घेतली आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे. भगवान शंकरांच्या गळ्यातही सापच आहे. भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना शंकराचा अवतार मानतात. मग सापाचा एवढा तिटकारा का? असा सवाल शिवसेनेने (ठाकरे गट) मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून केला आहे. यावर आता भजप नेत्या तथा भाजप महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पलटवार केला आहे.
यासंदर्भात ट्विट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्यावर बोचरी टिका केली आहे. "हिरवा साप गळ्यात घेऊन फिरणारे जनाब सर्वज्ञानी पंतप्रधानजी यांच्यावर टिका करू लागलेत. राऊतांना काँग्रेसची हुजरेगिरी करावी लागतेय, यापेक्षा दुर्देव काय असणार? त्यांची निष्ठा आता कांग्रेसच्या चरणी वाहतेय. सत्तेसाठी खुर्च्या उचलणारे राऊत आता काँग्रेस नेत्यांच्या चपलाही उचलायला लागलेत, यात आश्चर्य ते काय?" असे चित्रावाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात? -"शंकराने विष पचवले म्हणून तो निळकंठ झाला. काही लोकांना पंतप्रधान मोदी हे विष्णू आणि शंकराचे आवतार वाटतात. मग साप गळ्यात घालून विष पचवणाऱ्या शंकराशी तुलना होताच राजकीय तांडव करण्याची गरज काय? भाजपच्या जिभांतील विषामुळे आपल्या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य गतप्राण झाले आहे. न्यायालये, संसद आणि सर्व घटनात्मक संस्थांना सापांचा विळखा पडला आहे. लोकशाहीच्या नावाने मोदी रोज पुंगी वाजवतात. त्यावर अंधभक्त डोलतात. जे डोलत नाहीत त्यांना देशद्रोही ठरवून छळले जातात," असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हणण्यात आले आहे.