विजयादशमीनिमित्त आज मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे रंगले. दादरमधील शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी तर आझाद मैदानावर झालेल्या दुसऱ्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. दरम्यान, या मेळाव्यात रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये दोन्ही नेत्यांनी रामायणातील उदाहरणांचा वापर करत एकमेकांवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे यांनी रामायणातील उदाहरण देत शिंदे गटाला इशारा दिला. त्यात ते म्हणाले की, रावण हासुद्धा शिवभक्त होता. तरीही श्रीरामाला रावणाचा वध करावा लागला. कारण त्यानं सीतेचं हरण केलं होतं. आजसुद्धा आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतोय. पण पळवणाऱ्यांनी एक खबरदारी घेतलीय. श्रीरामांनी धनुष्यबाणाने रावणाचा वध केला होता. म्हणून यांनी धनुष्यबाणसुद्धा पळवलाय. पण एक लक्षात ठेवा ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची सोन्याची लंका दहन केली होती. तशीच तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी धगधगत्या मशाली आमच्याकडे आहेत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
तर उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंनीही रामायणातील दाखला देत प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे दोन माणसं पाठवली आणि मुख्यमंत्रिपदासाठी स्वत:च्या नावाची शिफारस करायला लावली. उद्धव ठाकरें यांना २००४ पासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं. सीतेचं हरण करण्यासाठी रावणानं साधूचं रूप घेतलं होतं. तर मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे संधीसाधू बनले, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.