मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. सीतारमन यांनी केलेलं अर्थसंकल्पीय भाषण हे इतिहासातील सर्वात दीर्घ लांबीचं ठरलं आहे. तर सीतारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पानंतर राजकीय प्रतिक्रिया येत असून, केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या विकासाला उर्जा देणारा असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
दानवे म्हणाले, केंद्र सरकारने देशातील सर्व बाबींचा अभ्यास करुन अर्थतज्ज्ञांनी ज्या-ज्या काही सूचना केल्या होत्या त्यातील बहुतांश सूचनांचे पालन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वीकारल्या आहेत. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी 16 कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. यासह अनेक सकारात्मक बाबी अर्थसंकल्पात समाविष्ट असल्याचे दानवे म्हणाले.
तर घरकुल योजना, मागासवर्गीयांच्या विकासासाठीची तरतूद, उच्च शिक्षण, प्रत्येक जिल्ह्यात पीपीपी तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या बाबीला महत्व दिले आहे. त्यामुळे अर्थमंत्री सीतारमन यांनी सादर केलेला 2020 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प देशाच्या विकासाला नवीन उर्जा देणारा असल्याचेही दानवे यावेळी म्हणाले.