मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतील स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी धरलेला आग्रह आणि भाजपाने सत्तास्थानांच्या समसमान वाटपाबाबत घेतलेली आडमुठी भूमिका यामुळे अद्याप नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दोन्ही पक्षांमधील मतभेद दूर करून सरकार स्थापन करण्यासाठी 1995 चा फॉर्म्युला सुचवला आहे. आम्ही या फॉर्म्युल्यावर काम करू आणि राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे सरकास स्थापन होईल, असे दानवे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगावर बोलताना दानवे म्हणाले की, ''महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला जनादेश मिळाला आहे. आमच्यामध्ये कोण्यातील प्रकारचे भांडण नाही आहे. आमच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत. ते आम्ही एकत्र बसून चर्चा करून सोडवू. दरम्यान, आम्ही 1995 च्या सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर विचार करत असून, राज्यात भाजपा आणि शिवसेनेचेच सरकार स्थापन होईल.''
1995 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे तत्कालीन बडे नेते प्रमोद महाजन यांच्यात युतीचा एक फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार सर्वाधिक जागा असणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री आणि तर कमी जागा असणाऱ्यांकडे उपमुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाची खाती राहतील, असे निश्चित झाले होते. दरम्यान, आता अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडून शिवसेना या फॉर्म्युल्यावर राजी होते का हे पाहावे लागेल.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर फडणवीस यांनी राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल, असे सांगितले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात लवकर नवं सरकार स्थापन होईल, सत्ता स्थापनेबाबत कोण काय बोलतंय यावर बोलणार नाही असं सांगत महाराष्ट्राला नवीन सरकार देण्याची आवश्यकता आहे. लवकरच सरकार स्थापन करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण विशेषत: या प्रतिक्रियेवेळी मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा उल्लेख टाळल्याचं दिसून आलं. त्यामुळे राज्यात सरकार कुणाचे स्थापन होणार याबाबत आणखी गूढ वाढलं आहे. तसेच सत्ता स्थापनेवर बरेच जण बोलत आहेत. मात्र आम्ही त्यावर बोलणार नाही, भाजपाकडूनही कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ४० मिनिटे चर्चा झाली. यावेळी फक्त देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाच उपस्थित होते. त्यामुळे राज्यात भाजपा-शिवसेना यांच्यातील तणाव वाढत चालल्याचं दिसून येत आहे. संध्याकाळी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात भेट होणार आहे. या भेटीनंतर आघाडीची भूमिका स्पष्ट होईल त्यामुळे भाजपादेखील या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे आणखी काही काळ वेळकाढूपणाची भूमिका भाजपाने घेतल्याचे दिसतंय. महत्त्वाच्या बातम्या