मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार रावसाहेब दानवे यांची फेरनिवड होणार हे जवळपास निश्चित झाले असून, निवडीची औपचारिकता सोमवारी पार पाडली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.दानवे यांनी रविवारी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शहा व इतर वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा सादर केला. भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेंतर्गत राज्यात १ कोटी ५ लाख सदस्यांची नोंदणी करून, यापूर्वीच दानवे यांनी पक्षश्रेष्ठींकडून प्रशस्ती मिळविली होती. शिवाय वर्षभरात ७०० प्रशिक्षण शिबिरे घेऊन संघटना बांधणीसाठी केलेले प्रयत्नही त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले.भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडी होत असून, आत्तापर्यंत ४५ जिल्ह्यांच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. (भाजपाच्या ६५ संघटनात्मक शाखांना जिल्हा दर्जा आहे.) राज्यस्तरीय अध्यक्षाची निवड प्रक्रिया पार पाडण्यास पक्षश्रेष्ठींकडून सिग्नल मिळाला असल्याने ही प्रक्रिया सोमवारी पूर्ण केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांची सोमवारी मुंबई येथे निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर खा. रावसाहेब दानवे शनिवारी रात्री नागपुरात दाखल झाले. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांनी दानवे यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आहे. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुंबईत निवड होणार असल्यामुळे नागपुरातील बहुतांश पदाधिकारी सायंकाळी मुंबईसाठी रवाना झाले. दानवे रात्री नागपुरात दाखल झाले. दानवे थेट वाड्यावर पोहचले. त्यांनी गडकरींची भेट घेतली. सुमारे तासभर गडकरींशी चर्चा केली. या भेटीनंतर दानवे यांनी संघ नेत्यांशीही भेट घेण्याचे प्रयत्न केले. पण बराच उशीर झाल्यामुळे भेट होऊ शकली नाही, असे समजते.
रावसाहेब दानवेंची आज प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड?
By admin | Published: January 18, 2016 3:11 AM