अहमदनगर - भारतीय उद्योगपतीमध्ये सर्वात जास्त फॅन फॉलोईंग कुणाची असेल तर अर्थात ती रतन टाटा यांची. भारतातील औद्योगिक जडणघडणीत रतन टाटांचा मोठा वाटा आहे. त्याचसोबत देशासाठी टाटा यांनी दिलेले योगदान कुणीच नाकारू शकणार नाही. रतन टाटांच्या याच प्रेरणेतून अहमदनगरच्या रवी पाटोळेंवर टाटांचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे जीवनातील प्रत्येक गोष्टीत पाटोळे यांनी टाटा यांच्या उत्पादनाला प्राधान्य दिले आहे.
रवी पाटोळे म्हणतात की, मागील २००६ पासून मी रतन टाटांचा खूप मोठा फॅन आहे. टाटा यांचं देशातील समाजकार्यानं मी प्रेरित झालो. टाटा कंपनीचा मोबाईल मी विकत घेतला. फॅन झालो तर काय करायला हवं त्यासाठी घरात मी मिठापासून चारचाकीपर्यत टाटानं उत्पादन केलेल्या वस्तू खरेदी करतो. माझ्या घरात टाटा स्काय, जी काही ऑनलाईन शॉपिंग करतो ती टाटा क्लिक साईटवरून खरेदी करतो. २०११ मध्ये मी टाटाची व्हिस्टा कार खरेदी केली. त्यानंतर दुसरी कार टिगोर म्हणून घेतली. इन्सुरन्सही टाटा कंपनीच्या AIG मधून काढला आहे असं त्यांनी सांगितले.
रतन टाटा यांनी देशासाठी जे काही केले ते साहजिकच कुणी करणार नाही. रतन टाटा या व्यक्तींबद्दल कुणी वाईट बोलू शकत नाही. मी एखाद्या नेत्याचा फोटो लावला असता तर मला त्या पक्षाशी संबंधित केले असते. परंतु हा व्यक्ती जो कुठल्याही जाती धर्म, पंतापेक्षा मोठा आहे. त्यांच्याबद्दल वाईट बोलणारं शोधूनही सापडणार नाही. ५७ भाषेत भारताचा गौरव रतन टाटा हे चित्र कारवर चिटकवलं आहे असंही रवी पाटोळे यांनी सांगितले.
दरम्यान, पेशाने फोटोग्राफर असलेल्या रवी पाटोळे यांच्या पत्नीनेही पतीच्या टाटा प्रेमाची कबुली दिली. त्या म्हणाल्या की, आमचे लग्न २००७ मध्ये जमले. तेव्हा मला त्यांनी टाटाचा मोबाईल दिला. मी सासरी आले तेव्हा घरात बऱ्याच गोष्टी टाटा कंपनीच्या आढळल्या. मिठ, चहा पावडर, डिश या सगळ्या गोष्टी टाटा कंपनीच्या आहेत. टाटा वगळता इतर कंपनीचे प्रोडेक्ट ते वापरत नाहीत. TATA The Pride of India ही कन्सेप्ट कारवर फोटोच्या माध्यमातून पतीने उतरवली असं रवी पाटोळे यांच्या पत्नीने सांगितले.