ठाणे : उल्हासनगरमधील व्यापाऱ्याला फोन करून तसेच एसएमएस पाठवून पाच कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या रवी पुजारीच्या आणखी चार हस्तकांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन चॉपर आणि पाच मोबाइल असा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.अटकेतील हनुमान म्हात्रे हा अवैध रेती उत्खनन व बांधकाम साहित्याचा व्यवसाय करणारा आहे. तसेच तो या व्यवसायातील साथीदार गौरवच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकांची माहिती म्हात्रेला देत होता. तसेच म्हात्रे ती काशिराम पाशीला देऊन तो रवी पुजारीकडे पोहोचवत असे. मग, रवी पुजारीकडून संबंधित व्यावसायिकांना फोन येत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली. काशिराम हा मुंबईतील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, गोळीबार अशा प्रकारचे ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर यापूर्वी मकोकान्वये कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून चॉपर, दोन मोबाइल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत. गौरव याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न तसेच बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून एक पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे व मोबाइल असा ऐवज मिळाला आहे. कैलास याच्यावरही खंडणीचे दोन गुन्हे दाखल असून त्याच्याकडून १ पिस्तूल, २ जिवंत काडतुसे व दोन मोबाइल हस्तगत केले आहेत. तसेच हनुमान याच्यावर खुनाचे, मारामारीचे गुन्हे दाखल असून त्याच्याकडे एक चॉपर आणि मोबाइल मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.टी. कदम यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)
रवी पुजारी टोळीचे आणखी चार हस्तक गजाआड
By admin | Published: April 20, 2015 2:35 AM