Maharashtra Politics:अनिल परब यांच्याशी निगडीत कार्यालयावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यातील वाद पेटला. म्हाडा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक थेट वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात घुसले. कार्यालयात जोरदार राडा झाला. कार्यकर्त्यांच्यापाठोपाठ आता अनिल परबही म्हाडा कार्यालयात दाखल झाले. या प्रकारावर अपक्ष आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत, ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना हाताशी घेऊन अनिल परब कट-कारस्थाने करतात, असा मोठा आरोप रवी राणा यांनी केला आहे.
आंदोलन करणारे चेहरे माझ्या घरावर आंदोलन करण्यासाठी अनिल परब यांनी पाठविले होते. किरीट सोमय्यांना भेटायला गेलो असताना त्यांच्यावर हल्ला करणारे हेच ते आंदोलनकारी होते. तो हल्लासुद्धा अनिल परब यांच्या लोकांनीच केला. त्यावेळी सोमय्या यांची गाडी फोडण्यात आली. अशाप्रकारची कट-कारस्थाने उद्धव ठाकरे यांना हाताशी घेऊन अनिल परब करत असतात.
महापालिका ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे होती
मीडियाशी बोलताना रवी राणा म्हणाले की, महापालिकेचे अधिकारी येतात. घराचे मोजमाप करतात. बिल्डिंगला एनओसी कुणी दिली. महापालिका ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे होती. माझ्यासारख्या मराठी माणसाने याठिकाणी फ्लॅट घेतले. मुंबईत अशा हजारो बिल्डिंग आहेत. या बिल्डिंगला महापालिकेने एनओसी दिली. उद्धव ठाकरे यांच्या महापालिकेच्या संबंधित महापौरांनी त्यासाठी पैसे खाल्ले. अनिल परब यांनी महापालिकेची अनेक वर्षे दलाली केली. मराठी माणसांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम अनिल परब यांनी केले, असा आरोपही रवी राणा यांनी केला आहे.
फडणवीस यांनी हजारो गरिबांना घरे देण्याचे काम केले
देवेंद्र फडणवीस हे म्हाडाचे मंत्री आहेत. फडणवीस यांनी हजारो गरिबांना घरे देण्याचे काम केले. अनेक गरिबांना पक्के घरे दिली. उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत बिल्डर लोकांची घरे भरली, असा दावा रवी राणा यांनी केला. दरम्यान, अनिल परब यांनी ज्या ठिकाणी पाडकाम केले गेले त्याच ठिकाणाहून पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरण सांगितले. किरीट सोमय्यांनी केलेल्या तक्रारीवर म्हाडाकडून तातडीने दखल घेतली जाते. पण नारायण राणेंच्या बंगल्याबाबत अधिकारी शांत कसे? असा सवाल उपस्थित करत याचा जाब म्हाडाच्या अधिकाऱ्यांना विचारणार असल्याचे अनिल परब यांनी म्हटले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी म्हाडाचे कार्यालय गाठले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"