अमरावती - राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात राजकीय सामना रंगलेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवायांना वेग आला आहे. तसेच काल राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याने महाविकास आघाडी सरकार अधिकच अडचणीत येणार असल्याचे दावे केले जात आहेत. दरम्यान, आता राज्यातील ठाकरे सरकार पडणार असून, लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचा खळबळजनक दावा आमदार रवि राणा यांनी केला आहे.
रवी राणा राज्यातील घडामोडींबाबत म्हणाले की, आता महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. राज्यात राष्ट्रपती शासन लागेल अशी परिस्थिती आहे. आज महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर हे सरकार पाडावे लागेल. वेळ आली तर राष्ट्रपती शासन लावावं लागेल. तसेच जे जे मंत्री घोटाळेबाज आहेत, त्यांना तुरुंगात टाकावं लागेल.
दरम्यान हे सरकार पडेल का असे विचारले असता रवी राणा म्हणाले की, हे सरकार पाडण्याची गरज नाही. हे तीन तिघाडी सरकार आहे. तीन पक्षांचं सरकार आहे. त्यात कुणाचा कुणाला ताळमेळ नाही आहे. सरकारमधील जे नेते गजाआड जातील आणि जे गजाआड जाण्याच्या तयारीत आहेत. त्याच्यावरून वाटतं की हे नेते स्वत:च सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावतील, अशी शक्यता आहे, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी रवी राणा यांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. यणाऱ्या काळात अनिल परब हेसुद्धा तुरुंगात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांची चौकशी आणि फाईल पूर्ण झाली आहे. अनिल परब हे गजाआड दिसतील, असा दावाही रवी राणा यांनी केला.