नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:21 PM2024-10-17T15:21:21+5:302024-10-17T15:22:52+5:30
Nanded Lok Sabha By-Election : नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार घोषित केला असून, दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण () यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच २० नोव्हेंबर रोजी नांदेड लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार घोषित केला असून, दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं २६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजारानं निधन झालं होतं. वसंतराव चव्हाण यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. मात्र ही निवडणूक आटोपल्यानंतर काही काळानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी हैदराबाद येते नेण्यात आले होते. मात्र तिथेच त्यांचं निधन झालं होतं.
दरम्यान, वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभेच्या जागेवर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. अखेर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे.