Maharashtra News: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख ठरली, तरी मुख्यमंत्री कोण, याची घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपचा मुख्यमंत्री होणार असला, तरी घोषणा न झाल्याने अनेक नेत्यांची नावे राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहेत. अशात माजी कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा होत असून, त्यांनी अमित शाहांची दिल्लीत भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यावर चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधीची तारीख निश्चित झाली असली, तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री म्हणून कोण कोण शपथ घेणार, याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, हे सांगितलं जात असलं, तरी त्यांच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे भाजपतील इतर नावांचीही मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा होत आहे. दरम्यान, रविंद्र चव्हाण यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली.
अमित शाहांच्या भेटीची चर्चा, रविंद्र चव्हाणांचे ट्विट
रविंद्र चव्हाण यांनी एक पोस्ट शेअर करत भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, "गेल्या २-३ दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाहीये. त्यामुळे कृपया प्रसार माध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, ही नम्र विनंती", असे रविंद्र चव्हाण म्हणाले.
महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर तिन्ही पक्षातील नेते मंत्रिपदासाठी ताकद लावताना दिसत आहेत. गेल्या आठवडाभरात देवेंद्र फडणवीस आणि इतर महत्त्वाच्या अनेक आमदारांनी भेटी घेतल्या. आगामी मंत्रिमंडळ शपथविधीच्या पार्श्वभूमीवर या भेटी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
मागच्या महायुतीच्या सरकारमध्ये मोजक्याच नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. गेल्यावेळी संधी न मिळालेले नेते यावेळी मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची आशा बाळगून आहेत. विशेषतः भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या मोठी आहे.