मुंबई : शिवसेना आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आदिवासींना सोयीसुविधा देण्याच्या नावाखाली २० एकर जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. वायकर यांच्या पत्नीशी संबंधित शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्थेला आरे कॉलनीत व्यायामशाळा उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. या व्यायामशाळेसाठी केवळ ३५० मीटर जागा मंजूर झालेली असताना वायकर यांनी नियमबाह्य पद्धतीने जास्त जमीन ताब्यात घेतली. या जमिनीची किंमत २५ कोटींच्या वर असून, तेथे अनधिकृतपणे पहिला मजला उभारण्यात आला. स्टीम व सोना बाथसह ३० ते ३५ खोल्यांचे बांधकाम केले आहे. तीन वर्षांहून अधिक आॅडिट झालेली सामाजिक संस्थाच अशा प्रकारचे उपक्रम राबवू शकते. वायकर यांच्या पत्नी व कुटुंबीयांशी संबंधित शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्थेची नोंदणीच झाली नसल्याचा दावा निरुपम यांनी केला. हे अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत आरे कॉलनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हाडाला तीनवेळा पत्र पाठविले. मार्च २०१५ ला म्हाडाला शेवटचे पत्र पाठविण्यात आले होते. मात्र, वायकर यांच्याकडे म्हाडाचा कारभार असल्याने कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप निरुपम यांनी केला.वायकरांनी आरोप फेटाळलेआरे कॉलनीत उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेबाबत संजय निरुपम यांनी केलेले आरोप अपुऱ्या माहितीच्या आधारे व राजकीय आकसापोटीच असल्याचे रवींंद्र वायकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
रवींद्र वायकरांनी लाटली आरे कॉलनीतील २० एकर जमीन
By admin | Published: June 23, 2016 4:32 AM