मुंबई : कोकण रेल्वेच्या रोहा ते वीर या पहिल्या टप्प्यातील दुहेरीकरणाचे काम रविवारपासून (८ नोव्हेंबर) सुरू करण्यात करण्यात आले. कोलाड येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील काम हे तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. हे पाहता संपूर्ण कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्यासाठी साधारपणे दहा वर्षे लागणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. रोहा ते ठोकूर ७४१ किलोमीटरच्या दुहेरीकरणाचे काम टप्प्याटप्यांत पूर्ण करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय आणि कोकण रेल्वेने घेतला आहे. यातील रोहा ते वीर या ४७ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यासाठी २९५ कोटी ५८ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी एलआयसीकडून कोकण रेल्वेला जवळपास २५0 कोटींचे कर्ज मिळणार आहे. संपूर्ण दुहेरीकरणासाठी साधारण दहा ते बारा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, ‘कोकण रेल्वेचे दुहेरीकरण झाल्यावर गाड्यांच्या फेऱ्या वाढतील आणि त्यामुळे कोकण रेल्वेला, तसेच प्रवाशांना त्याचा फायदा मिळेल. त्याचबरोबर गोवा ते दिल्ली राजधानी ट्रेनही लवकरच सुरू केली जाणार असून, त्याला रत्नागिरीला थांबा देण्यात येणार आहे.’कोकण रेल्वेचे महाप्रबंधक (प्रशासन) सिध्देश्वर तेलगु म्हणाले, ‘दुहेरीकरण झाल्यावर गाड्यांच्या रोजच्या फेऱ्या ४५ वरून ९0 वर जातील. संपूर्ण दुहेरीकरणाचे काम हे तीन ते चार टप्प्यांत पूर्ण केले जाईल.’
को. रे. दुहेरीकरणाचे काम सुरू
By admin | Published: November 09, 2015 3:27 AM