मुंबई : तेल उत्खननासाठी गेलेले १३ भारतीय खलाशी इंडोनेशियाच्या समुद्रात अडकून पडले आहेत. सागरी हद्दीत विनापरवाना जहाज उभे करून प्रदूषण केल्याचा आरोप करीत इंडोनेशियाच्या इंटरपोलने त्यांना जहाजावर बंदिवान करून ठेवले आहे. त्यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. या सर्व खलाशांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केल्याची माहिती जहाज बांधणी महासंचालनालयाकडून देण्यात आली.
‘एमटी स्ट्रोवोलोस’ हे जहाज वर्षभरापूर्वी आखातात तेल उत्खननासाठी गेले होते. परतताना चीनमध्ये कर्मचारी बदलले जाणार होते; परंतु भारतीय खलाशी असल्याने चीनने जहाजाला आपल्या हद्दीत प्रवेश दिला नाही. त्यामुळे थायलंडला जाऊन क्रू चेंज करायचा निर्णय घेण्यात आला; परंतु थायलंडलाही बर्थिंग न मिळाल्याने जहाज तिथून बायपास करून इंडोनेशियन सीमाक्षेत्रात आणण्यात आले. थायलंडने परवानगी दिल्यानंतर तिथे जाऊन क्रू चेंज करण्याचे ठरले; परंतु त्याआधीच इंडोनेशियन कोस्टगार्ड तेथे पोहोचले आणि त्यांनी जहाजाची तपासणी सुरू केली.
बरेच दिवस जहाज आमच्या सागरी हद्दीत उभे राहिल्यामुळे प्रदूषण झाल्याचा आरोप करीत कोस्टगार्डनी जहाजाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल केले. त्यानंतर इंडोनेशियन पोलिसांना यात सहभागी करून जहाजाचे कॅप्टन आणि मुख्य अभियंत्याला अटक केली. त्यांना चौकशीसाठी सोबत घेऊन गेले. त्यानंतर हे प्रकरण इंटरपोलकडे सोपविण्यात आले. इंटरपोलने जहाजावर बंदूकधारी सुरक्षारक्षक पाठवून सर्व कर्मचाऱ्यांना बंदिवासात ठेवले.
याप्रकरणात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. शिवाय इंडोनेशियातील भारतीय दूतावास आणि नौवहन मंत्रालय परस्पर समनव्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्व खलाशांच्या सुटकेसाठी आम्ही उच्च स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती डीजी शिपिंगकडून देण्यात आली.
चूक कोणाची?‘क्रीस एनर्जी’ या कंपनीने बहरीनमध्ये नोंदणी केलेले इंधनवाहू जहाज भाडेतत्त्वावर घेतले. त्याची मूळ मालकी सिंगापूरमधील ‘वर्ल्ड टँकर मॅनेजमेंट’कडे आहे. मूळ मालक आणि चालक यांच्यातील वादामुळेच खलाशी अडकून पडले आहेत. त्यात १३ भारतीयांचा समावेश असून तीन महाराष्ट्रातील तर दोघे मुंबईचे तर एक जण रत्नागिरीचा असल्याचे ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी सांगितले.
हे खलाशी अडकलेनागनाथ हजारे, ऋषिकेश भोरे, आलोककुमार तांडेल, सर्फराज तेतावलवर, श्रीनिवास रावडा, सुभाष दत्ता, मोहसीन पठाण, भानू प्रताप, अरविंद सिंह, रामकृष्ण मोसा, निकोलास फर्नांडो, अनिकेत कुमार.