भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील बहुजन समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचाच राग मनात धरून काही कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे. आता, रयत शिक्षण संस्थेनंही प्रेस नोट जारी करत चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध रयत संस्थेनं केला. त्यासोबतच, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कशारितीने शिक्षणासाठी पैसा उभारला, यांची इतंभू माहितीही दिली. तसेच, कर्मवीरांनी विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हे ब्रीद दिलं, भीक मागून शिक्षण न करता, स्वावलंबी होऊन शिक्षण घेण्याचा मंत्र दिला. म्हणूनच, 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' हे या संस्थेचं ब्रीदवाक्य कर्मवीरांनी दिलंय विशेष म्हणजे येथील कमवा आणि शिका योजनेची जागतिक पातळीवर दखलही घेतली गेली, असेही रयत शिक्षण संस्थेनं सांगितलं आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १०३ वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन आहे, ही दूरदृष्टी भाऊराव यांची होती. म्हणूनच मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. किर्लोस्कर, ओगले, कपूर या कंपनींमध्ये कर्मवीरांनी जे काम केलं. या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न, शेतीच्या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न, किर्लोस्कर कंपनीतील अण्णांचे शेअर्स, आई-वडिलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम, पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांच्या माहेरकडून मिळालेले १०० तोळे सोनं, मंगळसुत्रसुद्धा कर्मवीर भाऊरावांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केलं, अशी माहिती रयत शिक्षण संस्थेकडून देण्यात आली. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी हे पत्र ट्विटरवरुन शेअर केले आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस
खरे म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा शब्द चुकला असेल, तरी त्यांच्या वाक्यातील आशय घेतला पाहिजे. माध्यमांनाही माझी विनंती आहे की, पूर्ण वाक्याचा आशय न दाखवता, केवळ चुकीचा शब्द दाखवणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जी लोकं अशाप्रकारचे कृत्य करत आहेत, आंदोलन करत आहेत, त्यांनी आधी ते वाक्य नीट ऐकले पाहिजे आणि त्याचा आशय समजून घ्यायला पाहिजे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच, चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले आहे, जो शब्द खटकणारा आहे, त्याबद्दल त्यांनी खुलासा केलाय आणि माफीदेखील मागितली आहे. त्यानंतरही त्यांना टार्गेट करणे अतिशय चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.