कसारा : मुरबाड-पुणे मार्गावरील माळशेज घाटात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. दुर्दैवाने पुण्याहून विलेपार्ले येथे जाणाऱ्या बसवर महाकाय दरड कोसळली व बसमधील १ मुलगा मयत झाल्याचे समजते. दरम्यान, दरड कोसळल्यामुळे घाट सुमारे दोन तास ठप्प होता. घटनास्थळी पोलीस व यंत्रणा पोहोचण्यास वाहतूककोंडीमुळे उशीर झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही काळ गोंधळ उडाला होता.या घटनेची तत्काळ दखल घेत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी माळशेजकडे मदतकार्य पाठविले. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा पाठवून अडकलेल्या वाहनचालकांची सुटका केली. उपविभागीय पोलीस अधिकारी वाटेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पीडब्ल्यूडीचे कुठल्याही प्रकारचे मदतकार्य न मिळाल्याने वाहनचालकांनी दरड हटवली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून मयताचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
माळशेज घाटात बसवर दरड कोसळली
By admin | Published: June 15, 2015 2:10 AM