औरंगाबाद : अतिशय रंगतदार झालेल्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेतील हॉकी सामन्यात आरसीएफ संघाने बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात कोल्हापूरचा ३ विरुद्ध १ गोलने पराभव करीत चॅम्पियनचा बहुमान मिळवला. औरंगाबादचा गोलरक्षक कपिल भोजने याचे चपळ गोलरक्षण आरसीएफ संघाच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.हॉकीप्रेमींसाठी दोन्ही तुल्यबळ संघातील ही लढत खूपच प्रेक्षणीय आणि दर्जेदार खेळाची पर्वणी ठरली. २0१६ मध्ये विजेतेपद पटकावणारा कोल्हापूरचा तुल्यबळ संघ या वेळीही विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जात होता, तर या आधी दोन वेळेस विजेतेपद पटकावणारा आरसीएफचा संघ विजेतेपदाचा आसुसलेला होता. सातव्या मिनिटालाच मनोज मनगुडेने मैदानी गोल करत, कोल्हापूरला जबरदस्त सुरुवात करून दिली. तथापि, शॉर्ट पासेस अचुकता व जबरदस्त फिटनेस असणाऱ्या आरसीएफने आपला वेग उंचावताना जबरदस्त मुसंडी मारताना तीन गोल करीत अंतिम सामना जिंकला.स्पर्धेत सातत्य राखणाऱ्या संदेश मोरेने पूर्वार्ध संपण्यास अवघा एक मिनीट बाकी असताना करीत आरसीएफला बरोबरी साधून दिली. त्यानंतर, ५७ व्या मिनिटाला मोहसीन पठाण याने सुंदर गोल करीत आरसीएफची आघाडी दुप्पट केली, तर कर्णधार राहुल मेहकरेने ६५ व्या मिनिटाला तिसरा गोल करताना आरसीएफ संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. कोल्हापूरने गोल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला, परंतु औरंगाबादचा राष्ट्रीय खेळाडू कपिल भोजने याने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. तत्पूर्वी, झालेल्या रोमांचक लढतीत रेल्वे रेंजने टायब्रेकरमध्ये पुणे शहर संघावर ६-५ अशी मात करताना तिसऱ्या क्रमांकावर शिक्कामोर्तब केले. (क्रीडा प्रतिनिधी)सांघिक विजयकोल्हापूरचा संघ तुल्यबळ असल्याने सामना चुरशीचा झाला. सांघिक कामगिरीमुळे आम्हाला विजेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात यश मिळाले. गोलरक्षक कपिल भोजने याची कामगिरीही या स्पर्धेत नक्कीच निर्णायक ठरली, असे आरसीएफचा कर्णधार राहुल मेहकरे याने सांगितले.स्पर्धेचा आज समारोप७ तारखेपासून सुरू असलेल्या २९ व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप गुरुवारी १२ जानेवारी रोजी होत आहे. या समारोपास राज्यपाल विद्यासागर राव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. समारोप सोहळा बीड बायपासजवळील आय. आर. बी. मैदानावर रंगणार आहे.बास्केटबॉलमध्ये अमरावती अजिंक्यबास्केटबॉलच्या महिला गटात अमरावती परिक्षेत्राने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात अमरावतीने रेल्वे परिक्षेत्राचा ४0-३५ असा पराभव केला. अमरावतीकडून स्वप्निका गायकवाडने १३ व रश्मी इंगळेने ११ गुण नोंदवले. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत नाशिक परिक्षेत्राने नागपूरचा ४९-४८ असा निसटता पराभव करीत तिसरे स्थान मिळवले.मुंबईकर सोनिया मोकलचा ८00 मी. धावण्यात विक्रममैदानी स्पर्धेत एसआरपीएफ आणि कोल्हापूर परिक्षेत्राच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. एसआरपीएफच्य सुहास बेनके, सचिन गरोटे यांनी आपापल्या क्रीडा प्रकारात अव्वल स्थान मिळवले. महिलांच्या ८00 मीटर धावण्यात मुंबई शहरच्या सोनिका मोकलने नवीन विक्रम केला. सोनिका मोकल हिने गत वर्षी ८00 मी. धावण्याचा २.२१.0३ सेकंद हा विक्रम तोडून २.१0.0८ सेकंद हा विक्रम केला.पुणे व मुंबई अव्वलकुस्ती पुरुष गटात पुणे शहर संघाने २१ गुणांसह मुंबईकरांनी सर्वाधिक २५ गुणांसह महिला गटाच्या विजेतेपदावर कब्जा केला.आरपीएफच चॅम्पियनकबड्डीत पुरुष गटात एसआरपीएफने बलाढ्य मुंबईचा २३-१७ असा पराभव करुन जेतेपदाला गवसणी घातली.मुंबईला दुहेरी मुकुटखो-खोमध्ये मुंबई संघाने वर्चस्व राखताना पुरुष आणि महिला गटात विजेतेपद पटकावताना दुहेरी मुकुट मिळवला. पुरुष गटात मुंबईने कोकण परिक्षेत्र संघावर १६-१५ असे ३0 सेकंद आणि १ गुणाने विजय मिळवला. महिला गटात मुंबईकरांनी पोलीस संचालनालयचा पराभव करीत बाजी मारली.
‘आरसीएफ’चा हॉकी विजेतेपदावर कब्जा
By admin | Published: January 12, 2017 1:23 AM