मुंबई : गेले काही दिवस थांबलेले मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चाचे नियोजन पुन्हा सुरू होणार आहे. मोर्चाच्या समन्वयकांनी नियोजन बैठकांची घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत केली. येत्या श्निवारी, रविवारी मोर्चा संदर्भात बैठका होणार आहेत.संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी निघालेले मराठा मोर्चा अखेर देशाच्या आर्थिक राजधानीत धडकणार आहे. या मोर्चाचा ट्रायल म्हणून मुंबईत मराठा समाजाची बाइक रॅली व चक्का जाम आंदोलन झाले. त्यानंतर, मोर्चाचे नियोजन सुरू झाले. महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने मोर्चाचे नियोजन थांबले. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन समन्वयकांनी बैठकांचे वेळापत्रक जाहीर केले. समन्वयकांनी सांगितले की, सकल मराठा समाजातर्फे ६ मार्चला मुंबईत मोर्चा निघणार आहे. त्याची दिशा ठरवण्यासाठी मुंबई शहर व उपनगरांतील प्रतिनिधींची बैठक शनिवारी, २५ फेब्रुवारीला दादरच्या शिवाजी मंदिर सभागृहात सायंकाळी ४ वाजता होईल. रविवारी, २६ फेब्रुवारीला मुंबईतच राज्यस्तरीय प्रतिनिधींची बैठक होणार आहे.राज्यातील जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुकांत मराठा क्रांती मूक मोर्चाने कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात मतदान करण्याचे आवाहन मोर्चाने केलेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अफवांकडे दुर्लक्ष करा. मराठा क्रांती मूक मोर्चा हा केवळ मराठा समाजाच्या मागण्यांसाठी झगडणारा एक समूह आहे. तो कोणत्याही राजकीय पक्ष किंवा जाती-धर्माविरोधात नाही, असे समन्वयकांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
मराठा मोर्चाचे पुन्हा नियोजन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2017 6:49 AM