मुंबई : लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजा बसविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला होता. पश्चिम रेल्वेवरील एका लोकलवर करण्यात आलेला हा प्रयोग फसल्यानंतर पुन्हा एकदा हा प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली असून त्याला प्रतिसाद मिळाल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-बोरीवली लोकलच्या फर्स्ट क्लासच्या एका महिला डब्यात स्वयंचलित असणारे दरवाजे मेसर्स फेव्हर्ली या कंपनीकडून बसविण्यात आले होते. महालक्ष्मी येथील कारखान्यात हे काम करण्यात आले होते. मात्र काही दिवसानंतर या यंत्रणेत अडथळे येण्यास सुरुवात झाली आणि हा प्रयोग बंद करण्यात आला. दिल्ली मेट्रोचा अभ्यास करुन ही यंत्रणा बसविण्यात आली होती. मेट्रोच्या दरवाजाचे वजन शंभर किलो असताना पश्चिम रेल्वेने सिमेन्स लोकलला केवळ ५२ किलोचा दरवाजा बसवून प्रयोग केला. परंतु तो सपशेल अपयशी ठरला. पश्चिम रेल्वेवर केलेल्या प्रयोगात स्वयंचलित दरवाजाचे नियंत्रण हे गार्डच्या हातात देण्यात आले होते. मात्र ते हाताळताना बरीच कसरत करावी लागत होती. त्यामुळे हा प्रयोग मागे घेण्यात आला. त्यानंतर स्वयंचलित दरवाजा बसविण्यासाठी वेगळे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एका लोकलमध्ये २२ स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे नियोजन केले गेले. त्यासाठी मध्यंतरी निविदा काढण्यात आली होती. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्याला प्रतिसाद मिळाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. साधारण एक ते दोन महिन्यानंतर दरवाजे बसवण्याच्या कामास सुरुवात होईल. (प्रतिनिधी)
पुन्हा स्वयंचलित दरवाजाचा प्रयोग
By admin | Published: September 20, 2016 2:26 AM