नागपूर/शिर्डी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ट ड्राइव्ह घेतली. दोघांनी एकाच गाडीतून नागपूर ते शिर्डी प्रवास केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रवासाचे सारथ्य करीत ‘स्टेअरिंग’ स्वतःच्या हाती ठेवले. मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते. नागपुरातून दुपारी १२.४५ वाजता प्रवास सुरू झाला आणि ४ तास २९ मिनिटांत, सायंकाळी ५.१४ वाजता ते शिर्डीला पोहोचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरवला समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमी महामार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. रविवारी साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात आले. त्यांनी महामार्गावरील झिरो पॉइंट येथून प्रवास सुरु केला. गाडीत रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार व अन्य होते.
मुख्यमंत्री शिर्डीवरून थेट दिल्लीला रवानानागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाची पाहणी करून मुख्यमंत्री संध्याकाळी शिर्डीवरून थेट दिल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्री शिर्डीवरूनच दिल्लीला गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या; मात्र मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा पूर्वनियोजित होता. जी २० परिषदेच्या पूर्वतयारीसाठी पार पडणाऱ्या विशेष बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला पोहोचले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारताकडे राहणार आहे. या कालावधीत देशभरात परिषदेच्या १६१ बैठका होणार असून, त्यापैकी १४ बैठका महाराष्ट्रात होणार आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या बैठका मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या महानगरांमध्ये होणार आहेत. त्याचा दिल्लीत आढावा घेतला जाणार आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री सहभागी होतील.
महामार्गावरून धावताना जुन्या वाहनांची कसरतऔरंगाबाद : महामार्गावर ताफा पोहोचल्यानंतर काही मिनिटांनी पोलिसांची वाहने इंटरचेेंजवर पोहोचली. जुन्या वाहनांना पळविताना यंत्रणेला प्रचंड कसरत करावी लागल्याचे दिसले. प्रशासकीय यंत्रणा ताफ्याची वाट पाहत तीन तास उभी होती. गर्दी पांगविताना पोलिस यंत्रणेची प्रचंड तारांबळ उडाली.
काही ठिकाणी विरोधही...जालन्यात ताफ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर एका शेतकऱ्याने अतिवृष्टीचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याची व्यथा मांडली; मात्र ताफ्यातील गर्दीत प्रतिसाद मिळाला नाही. सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर शिवारात शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवत घेराव घालून निवेदन दिले.