अहमदनगर : 'साहेब, मागच्या काळात कर्जमाफीसाठी लईवेळा हेलपाटे मारावे लागले. यावेळी फक्त अंगठा दिला अन् काम झालं. ही कर्जमाफी लई सुटसुटीत आहे.' राहुरी तालक्यातील ब्राह्मणी गावच्या पोपटराव मोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना ही भावना व्यक्त केली. 'ही भावना म्हणजे या सरकारसाठी आशीर्वादच आहेत. आनंदात राहा आणि हे आशीर्वाद कायम असू द्या, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनाही शेतकऱ्याला दाद दिली.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील पात्र शेतकऱ्यांची यादी सोमवारी प्रसिद्ध झाली. दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रालयातील इतर मंत्री तसेच अधिकारी यांनी त्यातील काही गावांतील पात्र लाभार्थी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ब्राह्मणी (ता.राहरी) आणि जखणगाव येथील काही शेतकऱ्यांना या संवादाची संधी मिळाली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. एप्रिल महिन्याअखेर कर्जमाफीचा लाभ टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती एकत्र करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीतल्या 68 गावांमधल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.