मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही, अजित पवार आमचेच नेते असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्यानंतर या विधानावर शरद पवारांनीही हो आहेतच असं म्हणत दुजोरा दिला. राष्ट्रवादीत फूट नाही, काही लोकांनी वेगळा निर्णय घेतलाय असं विधान करून शरद पवारांनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. परंतु शरद पवारांच्या या गुगलीने मविआचे नेतेही संभ्रमात पडले.
एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते, त्यांचा अनुभव आहे. अजित पवार भेटीनंतर शरद पवार जी विधाने करतायेत. त्यामुळे अजित पवारच पुन्हा पवारांसोबत एकत्र येत पुढच्या राजकारणात सहभागी होतील असा अर्थ लावला जाऊ शकतो. अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवारांना यश आले असावे. शरद पवारांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. परंतु उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या पाठिशी आहोत. आमच्या मनात कुठलाही संभ्रम नाही, जनतेच्या मनात संभ्रम आहे तो ते दूर करतील असं वाटते.
तर या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे २ अध्यक्ष आहेत, एक जयंत पाटील, दुसरे सुनील तटकरे ही फूट नाही का? अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांची हकालपट्टी केलीय ही फूट नाही का? याला आम्ही फूट मानतो. लोकांच्या मनात कुठलाही संभ्रम नाही. राष्ट्रवादीत फूट पडलीय हे लोकांनी ठरवलेले आहे. मी आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडीत अजित पवार नाहीत शरद पवार आहेत. महाविकास आघाडीत भाजपासोबत हातमिळवणी करणाऱ्या कुठल्याही पक्षाला स्थान नाही. दोन दगडांवर पाय हे जर कुणाचे राजकारण असेल तर जनता भविष्यात निर्णय घेईल असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
दरम्यान, पक्ष फुटला आहे, ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवार त्यांच्याविरोधात बोलतायेत. दिलीप वळसे पाटील शरद पवारांविरोधात बोलतायेत. प्रफुल पटेल स्टेटमेंट पाहिले हे एकमेकांना धमकी देतायेत. एकमेकांना हात मिळवतात त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम आहे. शरद पवार पुरोगामी विचार सोडणार नाहीत असं वाटते अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.