यदु जोशी
लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. नाथ पै यांनी सभागृहात सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्षाचे सदस्य अधिक असल्याचे हेरून एक रुपयाची कपात सूचना मांडली. ही कपात सूचना मंजूर झाली असती तर तो सरकारचा पराभव ठरला असता. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांच्या लक्षात ही गडबड आली. त्यांनी नाथ पैंना त्यांच्या दालनात बोलावून घेतले. तेव्हा मी कपात सूचना मागे घेतो, पण तुम्ही कोकण रेल्वेच्या सर्वेक्षणाचा निर्णय घ्या, अशी अट नाथ पैंनी घातली. ती इंदिराजींनी मान्य केली आणि पुढे कोकण रेल्वेसाठी सर्वेक्षण झाले. नाथ पै यांचे शिष्य मधू दंडवते हे पुढे कोकण रेल्वेचे शिल्पकार ठरले.
विरोधकांच्या विचारांचाही तेवढाच आदर केला पाहिजे, असे नाथ पै आपल्या समर्थकांना सांगत. त्याकाळी फॉर्वर्ड ब्लॉकमध्ये सक्रिय असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची बेळगावमधील सभा पै यांच्या समर्थकांनी उधळून लावली. पै यांना ते कळले, तेव्हा तर्कतीर्थांची संध्याकाळी दुसरी सभा जिथे होती, तिथे ते गेले आणि आम्ही सभा उधळायला आलेलो नाही; तर आपले विचार ऐकायला आलो आहोत, असे सांगत त्यांनी तर्कतीर्थांचे पूर्ण भाषण ऐकले. आपण आपले विचार मांडावेत, दुसऱ्यांना रोखण्याचा आपल्याला अधिकार नाही. कोणाचा विचार योग्य आहे हे जनता ठरवेल. तसे झाले नाही तर लोकशाही जिवंत राहणार नाही, असे ते म्हणत असत.
नाथ पै राजापूर मतदारसंघातून तीनवेळा खासदार झाले. पहिल्यांदा ते खासदार कसे झाले याचा किस्साही रंजक आहे. १९५२ मध्ये समाजवादी नेते ना. ग. गोरे या मतदारसंघात लढले आणि काँग्रेसचे मोरेश्वर जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. १९५७ मध्ये नाथ पै यांनी राजापूरमधून लढावे, असे गोरे यांनी सुचविले आणि त्यांना उभेही केले. पै यांनी मोरेश्वर जोशी यांचा दारुण पराभव केला. खासदार म्हणून लोकसभेत कोणते प्रश्न विचारले, त्याला कुठले उत्तर मिळाले, असे सगळे ते संसदेच्या अधिवेशनानंतर मतदारसंघात सभा घेऊन सांगत असत. एक असेही खासदार होते, हे आज सांगून खरे वाटणार नाही.
लोकसभेतील त्यांची भाषणे पंडित नेहरू, इंदिराजीही चुकवत नसत. अटलबिहारी वाजपेयी हे त्यांना शब्दांचे जादूगार म्हणत असत. ९-१० भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मतदारसंघात कोणत्याही शासकीय विश्रामगृहात ते कधीही थांबत नसत, कार्यकर्त्यांच्या घरीच त्यांचा मुक्काम असे. माझ्या शरीरात एक हृदय आहे; पण जनतेसोबत जोडलेले दुसरे एक हृदयही आहे, ते माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे, असे ते म्हणत. त्यांनी हृदयविकाराकडे दुर्लक्ष केले आणि सामान्य माणसांशी अहोरात्र काम करीत राहिले. त्यांच्या पत्नी क्रिस्टल या मूळ व्हिएन्ना; ऑस्ट्रियाच्या होत्या. त्याही समाजवादी चळवळीत होत्या. नाथ पै यांच्या निधनानंतर आनंद आणि दिलीप या आपल्या दोन मुलांसह त्या व्हिएन्नाला परत गेल्या. मालवण येथे बॅ. नाथ पै सेवांगण ही सामाजिक कार्य करणारी संस्था विविध उपक्रम राबवत पै यांच्या स्मृती जपण्याचे काम १९८० पासून करते.