प्रज्ञा केळकर-सिंग, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)‘‘वाचनातून आपण माणूस म्हणून घडत असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. याउलट टीव्हीमुळे कल्पनाशक्तीला कुंपण घातले जाते. लोकांनी आपल्यावर टीका केली, तरी सकारात्मकतेने आयुष्याला सामोरे जा. भरपूर वाचा, मनाला आणि बुद्धीला खाद्य पुरवा, अनुभवसमृद्ध व्हा आणि मग लिहिते व्हा’’ असा गुरुमंत्र लेखक चेतन भगत यांनी गप्पांच्या ओघात तरुणाईला दिला.साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच ‘यूथ आयकॉन’ अशी ओळख असलेल्या लेखक चेतन भगत यांचा तरुणाईशी खास संवाद आयोजित करण्यात आला होता. चेतन भगत यांनी आयुष्याचे विविध टप्पे, अनुभव, पुस्तकांमागील विचारप्रक्रिया याबाबत दिलखुलासपणे एक एक पदर उलगडला. संमेलनातील ही मुलाखत सर्वाधिक रंगली आणि खुलली.मराठीतून रसिकांना अभिवादन करत त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली. ‘प्रेमाला नसते भाषेचे कुंपण, तिथे असते शब्दांची गुंफण’ असे सांगत त्यांनी संवाद साधला.मराठी संस्कृतीचे तोंडभरून कौतुक करताना चेतन भगत म्हणाले, ‘‘आजकाल मुलांसमोर मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने त्यांचे मन स्थिर नाही. त्यांना कंटाळा येण्याची भयंकर भीती वाटते. त्यांच्या कल्पनाविलासावर मर्यादा येतात. मुलांना चिमण्यांपेक्षा ‘अँग्री बर्ड’ जास्त जवळचा वाटतो. यातून बाहेर काढण्यासाठी मुलांना वाचनाची सवय लागली पाहिजे. एकाग्रता नसेल, तर चांगला विद्यार्थी घडत नाही.’’चेतन भगत यांनी तरुणांना स्वत:च स्वत:चे प्रेरणास्थान बनण्याचा मैत्रीचा सल्ला दिला. मनाचा आवाज ऐका आणि पुढे जा. प्रत्येक जण आपल्याबद्दल मते नोंदवत असतो. ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ हे सूत्र डोक्यात ठेवून वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळेल, असे त्यांनी सांगितले. याच वेळी स्वत:च्या संस्कृतीवर प्रेम कराच; पण, इतरांच्या संस्कृतीचा अनादर करू नका, असेही सांगितले. आजच्या तरुणांनी चतुर व्हावे की रांचो? असे विचारले असता, या दोन्हींचा प्रत्येकाने समतोल साधला पाहिजे, असा युक्तिवाद चेतन भगत यांनी केला. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक तरुणामध्ये चतुर आणि रांचो वसलेला आहे. या दोहोंचा समतोल कसा साधायचा, ही हातोटी शिकली पाहिजे. जीवनात बरेच धक्के खावे लागतात. एक रस्ता बंद झाला, तर दुसरा खुला होतोच. त्यामुळे नैराश्याला जीवनातून डिलिट करा. आयुष्यात भरपूर मजा करा. पण, भविष्याकडेही गांभीर्याने पाहा. करिअरची अनेक दालने तरुणांसमोर खुली आहेत. अशा वेळी मनाचा आवाज ऐका आणि आत्मविश्वासाने पुढे जा.’’आकडे आणि कृष्णचेतन भगत यांच्या प्रत्येक पुस्तकाच्या नावात आकड्यांचा वापर केलेला असतो. तसेच, पुस्तकातील नायकाचे नाव कृष्णाच्या नावाशी निगडित असते. याबाबत छेडले असता ते म्हणाले, ‘‘मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे आणि बँकेतही काम केले आहे. त्यामुळे आकड्यांशी जवळचा संबंध आहे. याच आकडेमोडीच्या आठवणी पुस्तकांच्या नावांमधून मी जपतो. माझे कृष्णावर खूप प्रेम आहे. एका पुस्तकाचा खप १ कोटी असेल आणि प्रत्येक पुस्तकात नायकाचे नाव किमान ६० वेळा वापरले जात असेल, तर माझ्यामुळे ६०० कोटी वेळा कृष्णाचा जप केला जातो.’’यावर पडल्या टाळ्या!माझे वय राहुल गांधींपेक्षा कमी आहे. त्यामुळे ते ‘मोस्ट इलिजिबल बॅचलर’ आहेत, तोवर मीही तरुणच राहणार!भारतात असेच घडते...एखादी मुलगी आवडते, खास ठरते, पण ती पूर्ण गर्लफ्रेंड नसते. तेव्हा आम्ही तिला ‘हाफ गर्लफ्रेंड’ म्हणतो!अभिनेत्याचे केवळ रंग-रूप पाहिले जाते; तर लेखकाचे विचार परावर्तित होतात. नायकापेक्षा जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे विवेकानंद जास्त भावतात.
वाचा, कल्पना करा, लिहा!
By admin | Published: January 19, 2016 3:18 AM