पुणे : सध्या वृत्तपत्रांमध्ये वृत्ताला आणि मताला प्राधान्य दिले जात नाही. ती जागा आता ‘पेज थ्री’ संस्कृतीने घेतली आहे. त्यामुळे वृत्तपत्रात अग्रलेखालाही महत्त्व उरले नसल्याने माझ्यासारखा वाचक आऊटडेटेड बनला आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केली.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नूतनीकरण केलेल्या कमिन्स सभागृहाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, पूर्वीचे पहिले पान वाचनीय असायचे. दुसऱ्या पानावर उद्या काय छापून येणार, याबाबतही प्रचंड उत्सुकता असायची. एखाद्या घटनेचे अथवा राजकीय घडामोडीचे वार्तांकन कोणता पत्रकार उद्या काय करेल, याबाबत वाचकांमध्ये उत्सुकता असे. मात्र, आता व्यावसायिकतेच्या वा जाहिरातीच्या या युगात पहिले पान सोडूनच पुढे जावे लागते. अग्रलेख हा गायब झाल्यासारखाच असून, त्याला दुय्यम स्थान प्राप्त झाले आहे. मागे दिल्ली प्रवासात एका वतर्मानपत्राच्या संपादकांशी भेट झाली. त्यांना अग्रलेखाबाबत विचारले असता त्याची आता काही गरज नसून, ‘पेज थ्री’ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. काय वाचावे, याचा सध्या शोध घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.शासन वेगळया वाटेवर जात असेल तर त्याला ताळयावर आणण्याची तसेच प्रसंगी शासनाची धोरणे बदलण्याची ताकद शोधपत्रकारितेत आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
माझ्यासारखा वाचक आउटडेटेड झालाय
By admin | Published: December 20, 2015 12:18 AM