ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २१ - शिवसेनेसोबत युती करण्यासाठी तयार आहोत, पण ती सन्मानपूर्वक हवी आहे. युती व्हावी असेच आम्हांला वाटते, नाही झाली तर स्वबळावर लढू असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पक्षाकडून महापालिका निवडणुककीचे तिकिट दिले जाणार नाही असे दानवे यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या शहर मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.
रावसाहेब दानवे म्हणाले, ‘‘विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याबाबत अजून चर्चा व्हायची आहे पण निवडणूक लढविणार हे निश्चित आहे. आमचे सरकार मराठा आरक्षणाचा अभ्यास करीत आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठयांना आरक्षण मिळावे अशीच आमची भुमिका आहे.’’
शहरातील गुन्हे दाखल असलेल्या काही नगरसेवक व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्यावरून दानवे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना भाजपकडून तिकिट देणार नाही. पक्षात प्रवेश देताना कोणालाही तिकिट देण्याचे आश्वासन देण्यात आले नाही.’’
मनसे शहर उपाध्यक्ष शिरीष भुजबळ यांनी यावेळी दानवे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला.