जालना - २४ तारखेपर्यंत मी कुणावर बोलणार नाही. त्यानंतर मराठा समाज कोण आहे हे सगळ्यांना कळेल. मी कधीही असं म्हटलो नाही की मी म्हणजे मराठा समाज. मला नितेश राणे यांच्याएवढा गर्व नाही.तुमचे मराठा समाजासाठी योगदान आहे. तुम्ही थांबावे, नसेल थांबायचे तर मराठ्यांचाही नाईलाज आहे. २४ तारखेनंतर बोलू. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही मिळाले तर पुढील लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री २४ डिसेंबरच्या आत १०० टक्के मराठ्यांना आरक्षण देतील. नेत्यांना जनतेनेच मोठे केले आहे. त्यांना पुन्हा पहिल्या टप्प्यावर आणायला गोरगरीब मराठ्यांना वेळ लागणार नाही. स्वत:च्या लेकरांच्या भवितव्यासाठी जे नेते विरोध करतायेत त्यांना सामान्य मराठा वठणीवर आणेल असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे असं वाटत नाही. आतापर्यंत ते चालढकल करत आहेत. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतो बोलले परंतु अद्याप घेतले नाहीत.काहींना मुद्दामातून अटक केली जातेय. ८ डिसेंबरला मराठा आरक्षणाचा विषय अधिवेशनात घेऊ असे बोलले पण तेही घेतले नाही. २ दिवसांत आरक्षणाबाबत टाईम बाँन्ड देऊ असं सांगितले परंतु दीड महिना उलटला तरी अद्याप टाईम बाँन्ड दिला नाही. त्यामुळे सरकार चालढकल करतंय हे दिसतंय. भुजबळांचे ऐकून तुम्ही मराठ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर सरकारला पश्चाताप होईल असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांपासून सदस्यांनी राजीनामे दिलेत. त्यावर खोलात जावे लागेल. मी माहिती घेत आहे. आरक्षणाची डेडलाईन जवळ आली आणि राजीनामा सत्र म्हणजे काय? मराठ्यांना फसवण्यासाठी हा डाव तर नाही ना..ओबीसी आयोग संविधानाने गठीत केला असला तरी एका समाजाला दुजाभाव देत असाल तर समाज त्यांना फैलावर घेतल्याशिवाय राहणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद
राज्य दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुढचा दौरा लवकरच सुरू होईल. मराठ्यांच्या लेकरांसाठी ही लढाई आहे. जिथे जाईल तिथे लोकांनी गर्दी केली. आरक्षण नसलेल्या लेकरांमागे समाज एकवटला आहे. रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम सगळीकडे झाले. आरक्षण मिळेपर्यंत ताकदीनं समाजानं पाठिशी उभे राहावे असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.