मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज असून तब्बल ४00 कर्मचारी कोकण मार्गावर विविध ठिकाणी तैनात राहतील, असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे पावसाचा जोर असल्यास ट्रेनचा वेग ताशी ४0 किमी एवढा ठेवण्याच्या सूचनाही लोको पायलटना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात कोकण रेल्वेवर दरड कोसळणे, माती खचणे, पाणी साचणे असे प्रकार होत असल्याने कोकण रेल्वे विस्कळीत राहते. पोमेंडी, निवसर, अडवलीसारखी ठिकाणे तर कोकण रेल्वेसमोर डोकेदुखीच ठरलेली आहेत. या ठिकाणी सुरक्षेचे उपाय केल्यानंतरही भूसख्खलनामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडतात. सुरक्षेच्या उपाययोजनांवर कोकण रेल्वेने १९९९ ते एप्रिल २0१४ या कालावधीत ३00 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. गेल्या वर्षातही सुमारे १७ कोटी खर्च करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. स्टोन कटींग आणि दरड कोसळू नयेत म्हणून संरक्षक जाळ्या बसविण्याबरोबरच पाणी साचू नये यासाठीही उपाय करण्यात आले आहेत, असे कोकण रेल्वेचे महाप्रबंधक सिध्देश्वर तेलगु यांनी सांगितले. दुहेरीकरणासाठी कोकण रेल्वेच करणार खर्चकोकण रेल्वेचे दुपदरीकरण केले जाणार असून त्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १,५00 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र प्रकल्पासाठी खर्च कोकण रेल्वेकडूनच करण्यात येणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले. परंतु कोकण रेल्वेचे उत्पन्न आणि त्यांना होणारा फायदा कमी असून, त्यांना खर्च परवडणारा नाही, असे पत्रकारांनी विचारले असता ते स्वतंत्र महामंडळ असून, तेच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
आपत्कालीन परिस्थितीसाठी कोकण रेल्वे सज्ज
By admin | Published: June 10, 2015 2:27 AM