नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पातील घरांसाठी 22 जुलैपासून अर्ज विक्री सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पात आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटांसाठी 704, तर अल्प उत्पन्न गटासाठी 2590 अशी एकूण 3294 घरे आहेत.
खारघर सेक्टर 36 येथे सिडकोने मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी 1244 घरांचा ‘व्हॅलीशिल्प’ हा गृहप्रकल्प साकारला आहे. अलीकडेच या घरांची सोडत काढण्यात आली. आता याच गृहसंकुलाच्या शेजारी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी हा मेगा गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. यातील घरांच्या किमती 16 ते 24 लाखांच्या घरात असणार आहेत. साधारण मार्च 2016 र्पयत या गृहप्रकल्पाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पातील घरांसाठी 22 जुलैपासून अर्ज विक्री सुरू करण्यात येणार असून ही योजना पुस्तिका पुढील असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पातील सदनिका विविध घटकांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी 5 टक्के, तर पत्रकारांसाठी 5 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, सिडको कर्मचारी, माथाडी कामगार, शारीरिक विकलांग आदींसाठी एकूण 5क् टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटासाठी मासिक उत्पन्न मर्यादा 16 हजारांपेक्षा कमी, तर अल्प उत्पन्न गटासाठीची मासिक उत्पन्न मर्यादा 16 ते 40 हजारांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. घराची संपूर्ण किमत 18 महिन्यांच्या कालावधीत सहा समान हप्त्यांत अदा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
बजेटमधील घरांचा दावा फोल
या प्रकल्पात आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकासाठी 28.55 चौरस मीटरच्या एकूण 704 सदनिका आहेत. त्यांची किंमत 15 लाख 78,300 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा दर प्रति चौरस फूट 5136 रुपये इतका आहे. तर अल्प उत्पन्न गटाच्या एकूण 2590 सदनिका आहेत. या गटातील सदनिकांचे एकूण क्षेत्रफळ 34.36 चौ.मी. इतके आहे. त्याची किंमत 23,93,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दर प्रति चौरस फुटासाठी अनुक्रमे 5136 रुपये व 6470 रुपये इतके आहेत. सध्याच्या बाजारभावापेक्षा हे दर अधिक असल्याने स्वस्त व बजेटमधील घरांची निर्मिती करण्याचा सिडकोचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे.