मुंबई - विधानसभा निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर आता विविध मतदार संघात प्रचाराला जोर आला असून लातूर ग्रामीण आणि लातूर शहर या दोन मतदार संघातून निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या दोन्ही मुलांसाठी अभिनेता रितेश देशमुख यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी रितेशने राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
आमदार अमित देशमुख आणि जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला. यावेळी लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अर्ज दाखल केलेल्यानंतर आयोजित सभेत रितेशने सरकारवर कडाडून टीका केली.
रितेश म्हणाले, मी अभिनेता आहे, जेव्हा जाहिरात करायची असते, तेव्हा आम्ही मेकअप करतो. सरकारच्या रस्त्यात अनेक खड्डे आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी मेकअप करण्यात येईल. परंतु, एक लक्षात ठेवा मेकअप कितीही चांगला असला तरी तो उतरला की खरा चेहरा समोर येतो. असाच मेकअप या सरकारने केला आहे. मेकअप हटविला की, यांचा खरा चेहरा समोर येणार, अशा शब्दांत रितेशने भाजपचा समाचार घेतला.
लातूरमधील तरुणांना वाटतं की, साहेबांना मतदान करायचं नशीब आम्हाला लाभल नाही. ही भावना नवीन मतदारांची आहे.परंतु, आता अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना मतदार करून तरुणांना ती कसर भरून काढता येणार आहे. तुम्ही साहेबांना घडवल, भैय्याला घडवले आता वेळ आली ती धीरजला घडविण्याची, असंही रितेश म्हणाले.
धीरज यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अद्याप विरोधकांना उमेदवार मिळाला नाही. चांगला मुहूर्त शोधून उमेदवार देऊ असं ते म्हणत आहेत. पण माझ म्हणणं आहे की, उमेदवार जाहीर करण्यापेक्षा 21 तारखेची वाट पाहा. कारण उमेदवार देऊन काहीही होणार नाही, असा टोलाही रितेशने लगावला.