मुंबई - रिअर अॅडमिरल राजेश पेंढारकर यांनी महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे प्रमुख म्हणून सोमवारी पदभार स्वीकारला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीचे विद्यार्थी असलेले पेंढारकर जानेवारी १९८७ मध्ये भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाले. पाणबुडीरोधक युद्धशास्त्रातले ते तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे. यापूर्वी आयएनएस क्रिपान, आयएनएस म्हैसूर, आयएनएस कोरा, आयएनएस शिवालिक आणि आयएनएस विराटसारख्या युद्धनौकांवर त्यांची नियुक्ती झाली होती. उल्लेखनीय सेवेबद्दल पेंढारकर यांना ‘विशिष्ट सेवा’ पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. संरक्षण विषयात डिफेंन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन; नेव्हल वॉर कॉलेज, कारंजा; नेव्हल कमांड कॉलेज, अमेरिका येथून त्यांनी पदवी संपादन केली आहे. शिवाय, संरक्षण आणि सामरिक शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केले आहे.