ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - राज्यातील पोलिसांवर होणारे हल्ल्यांचे प्रकार सुरूच असून एका तरूणाने पोलिसाच्या अंगावर दुचाकी घातल्याचा धक्कादायक शिवडीमध्ये घडला आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेत पोलिस गंगाराम निवते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी २८ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे.
विनाहेल्मेट प्रवास करत असलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला हटकल्यानंतर झालेल्या मारहाणीनंतर पोलीस शिपाई विलास शिंदे यांच्या मृत्यूला १५ दिवसही उलटत नाहीत तोच राज्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
२३ ऑगस्ट रोजी विलास शिंदे यांनी एका अल्पवयीन मुलाला विना हेल्मेट गाडी चालवताना पकडले होते. सदर मुलाकडे लायसन्सही नव्हते. दरम्यान, त्या मुलाची चौकशी सुरु असताना त्या मुलाने आपल्या भावाला बोलावून घेतले. यावेळी त्याच्या भावाने मागून येऊन थेट विलास शिंदे यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केला. या हल्ल्यात विलास शिंदे जबर जखमी होऊन बेशुद्ध पडले. या हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले. या घटनेनंतर विलास शिंदे यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर १ सप्टेंबर रोजी मुंबईत पोलीस हवालदाराला बाईक ठोकल्याची घटना समोर आली. विनोबा भावे पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या बैलबाजार चौकीवर कर्तव्य बजावत असताना नाकाबंदी दरम्यान देविदास अनिल निंबाळकर यांनी एका दुचाकीस्वारास थांबण्यास सांगितले असता त्यानं दुचाकी थेट निंबाळकर यांच्या अंगावर घातली. त्यामुळे पोलीस हवालदार देविदास निंबाळकर या अपघातात गंभीर जखमी झाले. काही दिवसांपूर्वी ठाण्यातही अशीच एक घटना घडली. दारूच्या नशेत उलट्या दिशेने गाडी चालवणा-या इसमाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर चढवून अर्धा किमी फरफटत नेले.