ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - आमच्या इशा-यानंतर सर्व पाकिस्तानी कलाकार ४८ तासांत भारत सोडून गेले असून मनसेच्या इतर आंदोलनांप्रमाणेच हे आंदोलन यशस्वी झाल्याचे मनसे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले.
उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्यास सांगितले होते. ' येत्या ४८ तासांत भारत सोडून पाकिस्तानात परत जा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने हुसकावून लावू' असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला होता. त्यानंतर सर्व बाजूने पाकिस्तानी कलाकारांविरोधातील वातावरण तापू लागले होते. अखेर आठवड्याभरानंतर एकही पाकिस्तानी कलाकार भारतात नसून दिग्दर्शक करण जोहरच्या ' ए दिल है मुश्किल' चित्रपटात प्रमुख भूमिका करणारा फवाद खानही गुपचुपरित्या भारतातून पळ काढल्याचे वृत्त समोर आले आहे.
हे सर्व मनसेच्या आंदोलनाचे यश आहे. मनसेची आंदोलने नेहमीच तडीस जातात. त्याप्रमाणे हेही आंदोलन यशस्वी झाले, असे खोपकर यांनी सांगितले. मनसेचे कोणत्याही कलाकाराला वैयक्तिक विरोध वा भांडण नाही. मात्र पाकिस्तानकडून भारतावर सतत होणारे हल्ले व त्यात जाणारे जवानांचे बळी आता सहन केले जाणार नाहीत. ज्यावेळी पाकिस्तानकडून होणारे हल्ले थांबतील तेव्हा आम्ही नक्कीच त्या कलाकारांचे स्वागत करू, मात्र तोपर्यंत कलाकारांना विरोध कायम राहील, असेही खोपकर यांनी स्पष्ट केले.
तसेच कोणताही पाकिस्तानी खेळाडू, गायक वा कॉमेंट्रेटरलाही (समालोचक) भारतात काम करता येणार नाही, असेही मनसेतर्फे नमूद करण्यात आले असून करण जोहरच्या ' ए दिल है मुश्किल'ला विरोध कायम असून तो प्रदर्शित होऊ देणार नसल्याचेही नमूद करण्यात आले.