मुंबई- दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात लाखो भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली आहे. आषाढी एकादशीला पहाटे लवकर होणारी पूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करण्याची प्रथा आहे. यंदा लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला न जाण्याच निर्णय घेतला आहे. दरवर्षी मुख्यमंत्र्यांबरोबर एका वारकरी जोडप्यालाही विठ्ठलपूजेचा सन्मान मिळतो. दरवर्षी अशा एका जोडप्याचा फोटो आणि त्यांची माहिती प्रसिद्ध होत असते मात्र या सन्मानासाठी जोडप्याची निवड कशी होते हे तुम्हाला माहिती आहे का ?पंढरपुरात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आपल्या दिंड्यांमधून येत असतात. पंढरपूरच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यापासून आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी भक्तांची रांग सुरु होते आणि ती कित्येक किलोमीटर दूरपर्यंत जाते. इतके दिवस चालत पंढरपूरला आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा थकवा दिसून येत नाही. केवळ विठोबाचे दर्शन होणार या एकमेव इच्छेसाठी हे लोक दर्शनाची वाट पाहात असतात. या रांगेत पहिल्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या जोडप्याला मुख्यमंत्र्यांबरोबर विठोबाची पूजा करण्याचा सन्मान मिळतो. पूजेनंतर त्यांचा यथोचित सत्कारही केला जातो. त्यामुळेच दरवर्षी एका जोडप्याला हा सन्मान दिला जातो.चंद्रभागेतीरी जमला 10 लाख वैष्णवांचा मेळा आषाढी एकादशीच्या सोहळ्याला पंढरपुरात भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर वाळवंटात हरीनामाचा गजर करत वारकऱ्यांनी दर्शन रांगेकडे प्रस्थान केले आहे. आज विठू-माऊलीचे दर्शन घेण्यासाठी अंदाजे 10 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
विठ्ठलभेटीच्या ओढीने गेल्या महिनाभरापासून उन,पाऊस आणि वाऱ्याची तमा न बाळगता विठ्ठलनामाचा जप करत पंढरीच्या दिशेने चालणारी पाऊले आज पंढरपूरात पोहोचली आहेत. तर ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा माऊलींच्या पालखींचेही पंढरपूरात आगमन झाले असून लाखो वारकऱ्यांची पाऊले चंद्रभागेतीरी विसावली आहेत. चंद्रभागा नदीला भरपूर पाणी असून निर्मळ आणि स्वच्छ चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी लाखो भाविक नदीपात्रात उतरले आहेत. टाळ, मृदंगाच्या गजरात पंढरीत विठूरायाचा जप सुरु आहे. अवघी पंढरी विठुनामाच्या गजरात दुमदुमली असून चोहीकडे वारकरीच दिसत आहेत.