कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. पण पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयंकर स्वरुपात पाहायला मिळाली. यात देशातील दोन राज्यांची संपूर्ण देशाची चिंता वाढवली होती. यात महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांचा समावेश होता. कारण या दोन्ही राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहायला मिळाला. केरळमध्ये कोरोनाची पहिली लाट त्यामानानं चांगल्या पद्धतीनं हाताळली गेली. पण दुसऱ्या लाटेत केरळमध्ये कोरोनाचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात वाढला.
महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ होण्यामागे काही महत्वाची कारणं होती. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार राज्यातील लोकसंख्येची घनता, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन न करणं इत्यादी कारणं प्रसार वाढण्यासाठी जबाबदार आहेत. याशिवाय ऋतूनुसार उद्भवणाऱ्या आजारांचंही यात योगदान आहे. मे महिन्यात महाराष्ट्रात अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण देशभरातील कोरोना रुग्णांच्या एकूण मृत्यूपैकी एच चतुर्थ्यांश मृत्यू एकट्या महाराष्ट्रात होत होते.
राज्यात सर्वाधित कोरोनाच चाचण्या देखील घेतल्या जात होत्या. एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात जवळपास ७० -७० लाख चाचण्या होत होत्या. नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या काळात जेव्हा कोरोनाचं संकट कमी झालं होतं तेव्हा राज्यात दरमहा १८ लाख चाचण्या होत होत्या.
महाराष्ट्रात दुसरी लाट गावागावात पोहोचलीकोरोनाची दुसरी लाट राज्यातील अगदी ग्रामीण भागांपर्यंत पोहोचली. त्यामुळे चिंतेत वाढ झाली. पहिल्या लाटेत मुंबईची वाईट परिस्थिती होती. कारण मुंबई सर्वाधिक वर्दळीचं, परदेशी पर्यटकांचं आण लोकसंख्येच्या घनतेचं ठिकाण आहे. त्यामुळे शहरातील लोकसंख्येचा विचार करता कोरोनाचा प्रसार होणं सहाजिक आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. पहिल्या लाटेत अमरावतीसारख्या इतर काही ठिकाणी दैनंदिन पातळीवर १०० कोरोना रुग्ण आढळत होते. तर मुंबईसारख्या ठिकाणी दिवसाला ३५ हजार रुग्णांची भर पडत होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अमरावती दिवसाला १ हजाराहून अधिक रुग्णांची वाढ होत होती. अमरावतीत कोणतंही आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही किंवा मुंबईसारखी लोकसंख्येची घनता देखील नाही. असं असतानाही अशा ठिकाणी रुग्णसंख्या वाढल्यानं राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार केला.
केरळमध्ये निवडणुकीचा बसला मोठा फटका?कोरोनाच्या पहिल्या लाटेवर केरळ राज्यानं चांगलं नियंत्रण मिळवलं होतं. पण दुसऱ्या लाटेत केरळमध्ये परिस्थिती बिघडलेली पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मतानुसार, केरळमध्ये झालेली निवडणूक कोरोना प्रसाराला कारणीभूत ठरली आहे. एप्रिल महिन्यात केरळमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. पण यासाठीची तयारी मार्च महिन्यापासूनच सुरू झाली होती. राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केलं गेलं.
१५ मार्च रोजी केरळमध्ये १,०५४ नवे रुग्ण आढळले होते. ३ ऑगस् २०२० नंतर ही सर्वात कमी आकडेवारी होती. पण मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात दैनंदिनरित्या १८०० हून अधिक रुग्ण वाढू लागले होते. महाराष्ट्राप्रमाणेच केरळनंही कोरोना चाचण्यांच्या बाबतीत कोणतीही कमतरता भासू दिली नाही. केरळमध्ये मे महिन्यात जवळपास ४० लाख कोरोना चाचण्या झाल्या होत्या.